शहरातील क. का. वाघ शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने पंख्याला गळफास घेतला. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. अस्मिता संजय पाटील (१८, ताहाराबाद रस्ता, सटाणा) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पंचवटीतील अमृतधाम परिसरात वाघ शिक्षण संस्थेचे तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. येथे स्थापत्य शाखेत दुसऱ्या वर्षात अस्मिता शिक्षण घेत होती. महाविद्यालय परिसरातील मुलींच्या वसतिगृहात ती वास्तव्यास होती.
हेही वाचा >>> नाशिक : विहिरीत तीन विद्यार्थ्यांना फेकून मारण्याचा प्रयत्न – संशयित ताब्यात
गणेशोत्सवात काही दिवस सुट्टी असल्याने ती सटाणा येथे घरी गेली होती. गुरुवारी ती गावाहून वसतिगृहात परतल्याचे नातेवाईक व परिचितांकडून सांगण्यात आले. अन्य सहकारी विद्यार्थिनी गावी गेल्या असल्याने खोलीत ती एकटीच होती. रात्री अस्मिता भोजनासाठी आली नाही. सकाळी ती चहा-नाश्त्यासाठी न आल्यामुळे वसतिगृहातील एका मैत्रिणीने खोलीचा दरवाजा वाजवून तिला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आतून प्रतिसाद न मिळाल्याने वसतिगृहाच्या प्रमुखांना कल्पना देण्यात आली. त्यानंतर अस्मिताने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. सटाणा येथील सधन कुटुंबातील अभ्यासात हुषार विद्यार्थिनीने इतके टोकाचे पाऊल का उचलले, यावर तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
© The Indian Express (P) Ltd