नाशिक – जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयात एकूण १८ हजार ३६९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे १८१ कोटी ३० लाख ७३ हजार ६८२ रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले.
आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक न्यायालय झाल्याची माहिती दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शिवाजी इंदलकर यांनी दिली. लोक न्यायालयात वेगवेगळ्या विषयांवर तडजोड करण्यात आली. त्यात आभासी पद्धतीने परदेशात असलेल्या पक्षकारांबरोबर करण्यात आलेल्या तडजोडीचा समावेश आहे. अपघाताचे एक प्रकरण न्यायालयात दाखल झाले होते. पीडित व्यक्ती सौदी अरेबियातील असल्याने न्यायालयात येणे शक्य नव्हते. लोक न्यायालय पथकप्रमुखांनी या पीडितास आभासी पद्धतीने (ऑनलाईन) न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले. विमा कंपनी आणि पीडित व्यक्ती यांच्यात तडजोड होवून एक लाख ४० हजार रुपये पीडित व्यक्तीला देण्यात आले.
एका मोटार अपघात प्रकरणात पक्षकाराला अपंगत्व आले होते. अंपगत्व आलेली व्यक्ती लोकन्यायालयात येवू शकत नसल्यामुळे न्यायालयाने न्यायालयाबाहेर पक्षकाराच्या वाहनापर्यंत जावून तपासणी केली. सदर प्रकरणात विमा कंपनी आणि पक्षकारामध्ये तडजोड होवून विमा कंपनीने ३७ लाख ५० हजार रुपये पक्षकारास देण्याचे मान्य केले.
हेही वाचा – पेठ रस्ता काँक्रिटीकरणास अखेर मान्यता; मनपा ४५ कोटी खर्च करणार
मोटार अपघात प्रकरणांमध्ये एकूण दोन हजार ३६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी २९३ प्रकरणे निकाली निघाली. वेगवेगळ्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींनी स्वत: आणि मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांनी जिल्हा न्यायालयात नुकसान भरपाईसाठी प्रकरणे दाखल केली होती. यात तडजोड होऊन जखमी व्यक्ती आणि मृत व्यक्तींच्या वारसांना २९३ प्रकरणांमध्ये एकूण ७२ कोटी ९५ लाख ७१, ९८० रुपयांची भरपाई मिळाली. नाशिकरोड येथील मोटार वाहन न्यायालयात दाखल एकूण एक हजार २९५ प्रकरणांपैकी ३०५ प्रकरणे लोकन्यायालयात निकाली निघाली. सदर वाहनचालकांना न्यायालयीन प्रकरणांपासून दिलासा मिळाला आहे. तसेच, कौटुंबिक वादविवाद झालेल्या २०४ प्रकरणांमध्ये लोकन्यायालयात तडजोड झाली.