नंदुरबार – जास्पर अर्थातच मौल्यवान सूर्यकांतमणी. नावाप्रमाणेच असलेल्या एका घोड्याची किंमत तुम्ही ऐकून थक्क व्हाल. एक, दोन नव्हे तर, तब्बल १९ कोटी रुपयांचा हा घोडा सध्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्याच्या घोडे बाजारात चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या सारंगखेडा यात्रोत्सव सुरु आहे. या यात्रोत्सवातील घोडे बाजार देशभर प्रसिद्ध आहे. या बाजारात दरवर्षी खरेदी-विक्रीसाठी दाखल होणारे विविध जातीचे उमदे घोडे हे नेहमीच आकर्षणाचा विषय असतात. त्यांच्या किंमतीही थक्क करणाऱ्या असतात. यंदा सर्वाधिक चर्चा सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिव्हलमध्ये दाखल झालेल्या बिग जास्पर घोड्याची.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहिल्यादेवीनगरच्या राजवीर स्टड फार्म सांभाळ करत असलेला हा घोडा सध्या सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र झाला आहे. बिग जास्परची किंमत तब्बल १९ कोटी रुपये आहे. बिग जास्पर हा ६८ इंचीचा असून महाराष्ट्रातील सर्वात जास्त उंचीचा घोडा असल्याचा दावा त्याच्या मालकांचा आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखविंदर सिंग बादल आणि संजमसिंग बादल यांच्याकडे सांभाळ झालेल्या बिग जास्परला अहिल्यादवी नगरचे माजी आमदार अरुण जगताप आणि विद्यमान आमदार संग्राम जगताप, सचिन जगताप यांनी खरेदी केले आहे. सध्या त्याची राखण राजवीर स्टड फार्म यांच्याकडून केली जात आहे.

हेही वाचा – मंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या वाहनावर संशयित गोवंश तस्करांचा हल्ला

हेही वाचा – मुंबईतील बोट अपघातातील मृतांमध्ये पिंपळगावच्या तिघांचा समावेश

बिग जास्परचे वय नऊ वर्ष इतके आहे. त्याची काळजी घेण्यासाठी पाच जणांचे पथक आहे. आरोग्याच्या तपासणीसाठीचे वैद्यकीय पथक वेगळेच. बिग जास्परचा आहार साधा असला तरी त्याला रोज जेवणात करड्याची कुट्टी, चन्याचा खुराक आणि सात लिटर दूध दिले जाते. सारंगखेड्याच्या बाजारात दरवर्षी कोट्यावधी रुपयांचे महागडे घोडे विशेष शोसाठी दाखल होतात. मात्र त्यांचे मालक ते घोडे विक्री करत नाहीत. घोड्यांचा चांगला जाणकार आणि ठेवलेली अपेक्षित किंमत मिळाल्यास बिग जास्परची विक्री केली जाईल, असे त्यांचे मालक सांगतात. त्यामुळे या १९ कोटींच्या घोड्याला नेमकी किती बोली लागते, कोण खरेदी करेल, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19 crore horse in sarangkheda chetak festival ssb