लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या तत्परतेचा अनुभव बोरीवली येथील प्रवाशांनी घेतला. महामंडळाच्या चालक तसेच वाहक यांच्या सतकर्तमुळे महिला प्रवासीला १९ तोळे सोने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल सुखरूप मिळाला. हा मुद्देमाल ताब्यात घेताना महिलेला अश्रू अनावर झाले. या कार्याबद्दल महामंडळाच्या वतीने वाहक आणि चालक यांचा सत्कार करण्यात आला.

मंगळवारी सकाळी बोरीवली येथून ई शिवाई बस नाशिकच्या दिशेने निघाली. नाशिक शहरात बस शिरल्यावर पाथर्डी फाटा या थांब्यावर काही महिला प्रवासी नातेवाईकांसह उतरल्या. अनावधानाने त्यांच्या हातातील पर्स बसमध्येच राहिली. बस आगार क्रमांक एकमध्ये आली. त्यावेळी पाथर्डी फाटा येथे उतरलेल्या महिलेची पर्स बसमध्येच राहिल्याचे चालक आणि वाहकांच्या लक्षात आले.

दरम्यान, पर्स बसमध्येच राहिल्याचे ध्यानात आल्यावर संबंधित महिलेने तातडीने रिक्षा करत बस स्थानक गाठले. बसमध्ये राहिलेली पर्स नियंत्रण कक्षात जमा करण्यासाठी वाहक सुरेश गांगुर्डे आणि चालक सोमनाथ चव्हाण हे त्या ठिकाणी पोहचले. त्याचवेळी तिथे आलेल्या महिलेने पर्स तिची असल्याचे सांगितले. स्थानक प्रमुख दादाजी महाजन यांच्यासमोर खातरजमा झाल्यानंतर पर्स त्यांना परत करण्यात आली. पर्स परत मिळाल्याने महिलेला अश्रु अनावर झाले. पर्समध्ये १९ तोळे सोने आणि पाच हजार रुपये रोख अशी रक्कम होती. महिला सातत्याने सर्वांचे आभार मानत होती.

तत्परता आणि प्रामाणिकपणा दाखविणारे गांगुर्डे आणि चव्हाण या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.