नाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद-पिंपळनेर मार्गावर दसवेल गावाजवळ बुधवारी रात्री राज्य परिवहन बसची ट्रॅक्टरला धडक बसल्याने २० ते २५ प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांना सटाणा, मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बस नवापूरहून नाशिककडे जात होती. बसची ट्रॅक्टरला पाठीमागून धडक बसली. दसवेलजवळील राजापूर फाटा येथे हा अपघात झाला. अपघाताची माहिती समजताच आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी धावून आले. जखमी प्रवाशांना मदत करण्यासाठी नागरिकांनी सिद्धी इंग्लिश मीडियम शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा मविप्रचे संचालक डॉ. प्रसाद सोनवणे यांच्याशी संपर्क केला. घटनेचे गांभीर्य ओळखून डॉ. सोनवणे यांनी तत्काळ शाळेच्या दोन बस घटनास्थळी पाठवल्या.

हेही वाचा…सारंगखेड्यातील चेतक फेस्टिव्हलमधील अश्वनृत्य स्पर्धेची रसिकांना भुरळ

गंभीर प्रवाशांना प्रथम ताहाराबादच्या शासकीय रुग्णालयात तर काहींना सटाण्यात पाठवण्यात आले. काही प्रवाशांना मालेगाव येथे पाठवण्यात आले. जायखेड्याचे सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी जखमी प्रवाशांची माहिती दिली. त्यानुसार मंगेश गावंडे, मेघराज गांगुर्डे, आशा शेलार, प्रशांत पाटील, अरविंद मावची, प्रमिला कोठावदे, चालक श्रावण कुवर, वाहक शिवाजी बागूल, गणेश देवरे, बेबी अहिरे आदींचा जखमींमध्ये समावेश आहे. जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Story img Loader