लोकसत्ता वार्ताहर
धुळे: शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या पळासनेर येथे ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस पथकाने एका संशयिताकडून मशिनगन, २० गावठी बंदुका आणि २८० जिवंत काडतुसे असा अग्निशस्त्रसाठा जप्त केला.
१० जुलै रोजी झालेल्या कारवाईची येथे माहिती देण्यात आली. संशयितास १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सुरजितसिंग उर्फ माजा आवसिंग (२७, रा. उमर्टी, मध्यप्रदेश) हा शस्त्र विक्रीसाठी पळासनेर येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे (घटक पाच) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. या आधारावर वागळे इस्टेट पोलिसांचे पथक १० जुलै रोजी पळासनेर येथे पोहोचले.
हेही वाचा… नाशिक: कर्मचाऱ्यांकडून मालकाला अडीच कोटींचा गंडा, सात जणांविरुध्द गुन्हा
सुरजितसिंग संबंधित ठिकाणी येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे गावठी बनावटीची मशिनगन, २० गावठी बंदुका, २८० जिवंत काडतुसे असा अग्निशस्त्रसाठा सापडला. पोलिसांनी त्याला ११ जुलै रोजी अटक करुन न्यायालयात हजर केले. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे युनिट-पाचचे वरिष्ठ निरीक्षक विकास घोडके,सहायक निरीक्षक भूषण शिंदे, अविनाश महाजन यांच्यासह पथकातील अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.