नाशिक : राज्यातील सर्व पंपांवर आता २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल वितरणास सुरुवात झाली आहे. यापूर्वी हे प्रमाण १० ते १५ टक्के होते. इथेनॉल मिश्रित पेट्रोल पाण्याच्या संपर्कात आल्यास वाहनांचे इंजिन खराब होण्याचा धोका संभवतो. याकडे पंपचालकांकडून लक्ष वेधले गेले. पुणे पेट्रोल वितरकांच्या संघटनेने पेट्रोल आणि वायू मंत्रालयाकडे यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. आता इथेनॉलचे दुपटीने वाढलेले प्रमाण वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा पाहणारी ठरण्याची शक्यता आहे.
बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयोसीएल या तेल कंपन्यांचे राज्यात जवळपास सहा हजार पंप असून या सर्व ठिकाणी सरसकट २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा पुरवठा सुरू झाल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले. सरकारी धोरणानुसार ही प्रक्रिया पुढे जात आहे. मात्र, इथेनॉलच्या बदललेल्या प्रमाणाविषयी कंपन्यांनी स्पष्टता केलेली नसल्याचे पंपचालकांचे म्हणणे आहे. अनेक पंपांवरील साठवणूक टाक्या जुन्या असल्याने तिथे पाणी गेल्यास इथेनॉल पेट्रोलपासून विलग होते. त्याचा रंगही बदलतो. असे इंधन भरल्याने वाहनात दोष उद्भवल्यास वाहनधारकांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागते, असा दावा त्यांनी केला.
आणखी वाचा-नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
इथेनॉलमिश्रित पेट्रोल विक्रीमुळे ग्राहकांची वाहने व पंपचालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार काही महिन्यांपूर्वी पुणे पेट्रोल वितरक संघटनेने केली होती. या घटनाक्रमात इथेनॉलचे प्रमाण वाढल्याने पंपचालकही धास्तावले आहेत. पंपावरील इंधन टाकी, वाहिनी व यासंबंधीची संपूर्ण व्यवस्था तेल कंपन्यांच्या मालकीची आहे. त्यामुळे टाकीत वा अन्यत्र पाणी जाणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी कंपन्यांची असल्याचे ते सांगतात. कंपन्यांना हे आक्षेप मान्य नाहीत. राज्यात काही पंपांवर प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग केल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली. वाहनधारकांच्या तक्रारी नसल्याचा दावा होत आहे.
आणखी वाचा-नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
पेट्रोल व इथेनॉल योग्य प्रकारे मिसळले तर, अडचणी येत नाहीत. काही पंपांवर २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल देऊन अभ्यास केला गेला. काही महिन्यांपासून ते वापरात असल्याची माहिती तेल कंपन्यांनी दिल्यास ग्राहकांची मानसिकता तयार होईल. -अमोल बनकर (सचिव, नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर वेल्फेअर असोसिएशन)
केंद्र सरकारच्या धोरणानुसार तेल कंपन्यांकडून राज्यात २० टक्के इथेनॉलमिश्रित इंधन वितरणास सुरुवात झाली आहे. पंपधारकांनी इथेनॉलमिश्रित इंधन असो की नसो, आपल्या टाकीत पाणी जाणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. इंधनातील इथेनॉलच्या प्रमाणाबद्दल इंधन कंपन्यांनी कधीही जाहिरात केलेली नाही. -विनोद बोस (व्यवस्थापक, बीपीसीएल, मनमाड डेपो)