नाशिक : बजरंग वाडी झोपडपट्टी परिसरात मार्च महिन्यात धुडगूस घालणाऱ्या दोन गुन्हेगारी टोळ्यांतील २० जणांना एकाचवेळी तडीपार करण्यात आले आहे. या प्रकरणातील चार अल्पवयीन बालके आणि कारागृहातील दोन संशयित वगळता उर्वरित २० जणांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. बजरंग वाडी परिसरात तीन महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी दोन गुन्हेगारी टोळ्यांचे आपसात वाद झाले होते. यावेळी काचेच्या बाटल्या, कोयत्याने परस्परांवर हल्ला करण्यात आला होता. दगडफेकही झाली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई नाका पोलीस ठाण्यातील अधिकारी व वरिष्ठांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होती. या प्रकरणी दहशत माजविणाऱ्या २६ जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. यात २२ संशयित आणि चार अल्पवयीन बालकांचा समावेश होता. संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांची परिसरात दहशत आहे. उपरोक्त घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन शांतता राखण्याच्या उद्देशाने मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की आणि सहायक आयुक्त डॉ. सिध्देश्वर धुमाळ यांच्या शिफारशीनुसार पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी चार अल्पवयीन बालके आणि कारागृहात असणारे दोन संशयित वगळता उर्वरित २० जणांना नाशिक जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यापुढेही गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीए, तडिपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 terrorizing criminals wanted nashik new ysh
Show comments