जळगाव शहरातील रस्त्यांसाठी २०० कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई येथे मंत्रालयात आयोजित बैठकीत केल्यानंतर ती लगेच मान्य झाली असून सहा महिन्यांत हा निधी मिळणार आहे.ग्रामविकास मंत्री महाजन यांच्या पुढाकाराने मुंबई येथे मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, संजय सावकारे या आमदारांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत येत्या सहा महिन्यांत शहरातील रस्ते दुरुस्त करण्याचा निर्णय झाला आहे. शहरातील रस्त्यांची दैना झाली असून, खड्डेमय रस्त्यांनी जळगावकर त्रस्त झाले आहेत.
हेही वाचा >>>धुळे: मालमोटार चालकाला मारहाण करुन लूट
रस्तेप्रश्नी जळगावकरांच्या टाहोकडे महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी कायम दुर्लक्ष केले आहे. राज्य शासनाकडून शहरासाठी साडेचार वर्षांपूर्वी १०० कोटींचा निधी मिळाला. मात्र, या साडेचार वर्षांत हा निधी खर्च होऊ शकलेला नसताना आता शहरातील रस्त्यांसाठी २०० कोटींच्या निधीचे नियोजन करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात १०० कोटींची कामे मार्गी लागल्यानंतर उर्वरित निधी मिळणार आहे. जूनपर्यंत निधी खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. रस्त्यांची कामे स्थानिक मक्तेदारांकडून न करता मोठ्या कंपन्यांना दिली जाणार आहेत. सर्व कामे एकाच मक्तेदाराकडून आणि चांगल्या गुणवत्तेची करून घेण्याविषयी लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. म्हाडाच्या घरकुलांचेही लेखापरीक्षण करून त्यांची कामे पूर्ण करून घेण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. तसेच रस्त्यांच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागासह महापालिका प्रशासनाला दिल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले