नाशिक – सटाणा तालुक्यातील खमताणे येथील शेतात चार शेतकऱ्यांनी मिळून एकत्रित रचून ठेवलेला तब्बल २०० ट्रॉली मक्याचा चारा सोमवारी रात्री कोणीतरी आग लावल्यामुळे भस्मसात झाला. चाऱ्यासोबतच एका शेतकऱ्याचा २० ट्रॉली मकाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. हातातोंडाशी आलेला घास अशा पद्धतीने हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खमताणे गावातील नवेगाव रस्त्यालगत धर्मा इंगळे यांचा ४८ ट्रॉली, विजय इंगळे यांचा १०३ ट्रॉली, वसंत इंगळे यांचा १३ ट्रॉली आणि वाल्मीक इंगळे यांचा १५ ट्रॉली मक्याचा चारा एकत्रितरित्या रचून ठेवण्यात आला होता. जवळच वाल्मीक इंगळे यांची २० ट्राॅली मक्याची कणसे ठेवलेली होती. सोमवारी रात्री कुणीतरी कोरड्या चाऱ्यास आग लावली. चाऱ्याने पेट घेतलेले दिसताच आजूबाजूच्या ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी धाव घेतली. सटाणा नगरपालिका आणि मालेगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबांनाही पाचारण करण्यात आले.

हेही वाचा – जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी रविवारी मतदान

परिसरातील दहापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर टँकरच्या साहाय्याने पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. चारा वाचविण्यासाठी मुंजवाड येथील धाबळे आणि हरी जाधव यांनी जेसीबीही उपलब्ध करून दिले. मुंजवाड, नवेगाव, निरपूर तिळवण, पिंपळदर येथील युवकांनी धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांनीही पोलीस दलासह आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, आग एवढी भीषण होती की त्यात जवळपास २०० ट्रॅक्टर ट्रॉली मका चारा जळून भस्मसात झाला. तसेच २० ट्रॉली कणसेही खाक झालीत. आग मंगळवारी सायंकाळपर्यंत धुमसत होती.

मंगळवारी आ. दिलीप बोरसे, माजी आमदार संजय चव्हाण यांसह इतरांनी पाहणी केली. चाऱ्यास जाणीवपूर्वक आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून याठिकाणाहून जवळील ओल्या शेतातून पळून जाताना अज्ञात व्यक्तीच्या पायाचे ठसे उमटल्याचे दिसून आले आहे. या अग्नीतांडवात शेतकऱ्यांची लाखोंची हानी झाली आहे. संबंधित चारही शेतकरी पशुपालक असून अल्पभूधारक आहेत. शेतीसोबत दुग्ध व्यवसाय करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. दुभत्या जनावरांसाठी त्यांनी परिसरातील ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांकडून मक्याचा कोरडा चारा खरेदी करून तो एकाच ठिकाणी रचून ठेवला होता. लवकरच यंत्राच्या साहाय्याने तो बारीक करण्यात येणार होता.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 200 trolleys of fodder and 20 trolleys of maize burnt in the fire in khamtana ssb
Show comments