नवीन आडगाव नाका येथे रविवारी कार्यक्रम रंगणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामाजिक एकोप्यासाठी सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता ढोल पथकांनी नवा आयाम दिला आहे. यंदा गणेशोत्सवात १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता नवीन आडगाव नाका येथे ‘नटनाद’ ढोल-ताशा पथकाकडून २०१ ध्वजांच्या माध्यमातून विश्वविक्रमासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

मुंबई, पुण्याच्या ढोल-ताशाचा गजर नाशिकमध्ये रुजत असताना शहर परिसरात ३० ढोल पथके सक्रिय आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळांच्या गणपतीला मानवंदना देण्यासाठी तसेच आगमन-विसर्जन मिरवणुकीसाठी या ढोल पथकांकडून जय्यत तयारी सुरू आहे.

लाडक्या गणपती बाप्पाला मानवंदना देण्यासाठी ‘नटनाद’ ढोल पथकाने आगळा पर्याय स्वीकारला आहे. ढोल-ताशा पथकाचा अविभाज्य भाग असलेल्या ध्वज पथकाच्या मदतीने रविवारी सायंकाळी समाधान जाधव यांच्या सहकार्याने आडगाव नाका मित्रमंडळाच्या बाप्पापुढे एकाच वेळी २०१ ध्वजांची मानवंदना देण्यात येणार आहे.

या तासाभराच्या अखंडित वादनासाठी पथकातील मंडळी सकाळ आणि सायंकाळ सत्रात चार तास सराव करीत आहेत. ढोल-ताशाचा गजर नाशिककरांना नवीन नसला तरी पथकातील वेगवेगळ्या भागाची माहिती व्हावी, ध्वजाचे महत्त्व लक्षात यावे यासाठी ध्वजवंदन पथकाची सलामी बाप्पाला देण्यात येणार आहे. सलामीसाठी २०१ वादक तयार असल्याची माहिती पथकप्रमुख विक्रांत सोनवणे, कुणाल आहिरे यांनी दिली. या कार्यक्रमाची नोंद जिनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात येईल. नाशिककरांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन ‘नटनाद’ पथकाने केले आहे.

या वेळी ५० ढोलचे पथक पाच पारंपरिक प्रकारांसह वेगवेगळ्या चालींचा आविष्कार सादर करणार आहे. त्याला शंख, वाद्य, ताशांची साथ राहणार असून हे वादन तासभर सुरू राहणार आहे. या कालावधीत कुठल्याही वादकाला बदलण्यात येणार नाही.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 201 flag salute from dhol tasha teams for the record
Show comments