लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: मुंबई ते आग्रा महामार्गावरील वडपे ते ठाणे दरम्यान अलीकडे-पलीकडे जाण्यासाठी एकूण २४ छेद आहेत. त्यातून वाहनांच्या मार्गक्रमणाने महामार्गावरील कोंडीत भर पडते. ही बाब लक्षात घेऊन या परिसरातील २१ छेद बंद करण्यात आले आहेत. वाहनधारकांना महामार्गावर दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी आता पुलांच्या खालून वळण घेऊन मार्गस्थ व्हावे लागणार आहे. अशा उपायांतून नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या काहीशी दूर करण्याचे नियोजन केले जात आहे.
जिल्ह्यातील महसूल सप्ताहाचा शुभारंभ पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी त्यांनी नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि अन्य समस्यांविषयी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुंबई:आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे असल्याचे त्यांनी मान्य केले. हा मार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणासमवेत दोन दिवसांत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सूचित केले. वाहनधारकांच्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या जातील. महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रहदारी सुरळीत राखण्याची सूचना अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दिल्या असल्याकडे भुसे यांनी लक्ष वेधले. वडपे ते ठाणे दरम्यानचा वळण रस्ता पूर्वी चारपदरी होता, तो १२ पदरी करण्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले. ते सध्या प्रगतीपथावर असले तरी यात आणखी काही काळ जाईल. तोपर्यंत मूळ रस्ता सुस्थितीत राखण्यासाठी सेवा रस्त्यांचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आल्याचे भुसे यांनी नमूद केले. मूळ रस्ता सुस्थितीत राखण्यासाठी डागडुजी करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
आणखी वाचा-जपानला जाणार रस्ता नंदुरबारमधून? दिशादर्शक फलक वाचून बसेल आश्चर्याचा धक्का…
या भागातील सुमारे २२ किलोमीटरच्या अंतरात २४ ठिकाणी एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी छेद आहेत. ते वाहतूक कोंडीला हातभार लावतात. त्यामुळे यातील २१ छेद बंद करण्यात आले. आता ज्या वाहनधारकांना पलीकडे जायचे असेल, त्यांना आहे त्या बाजूने सरळ जाऊन उड्डाण पुलाखालून दुसऱ्या बाजुला वळण घ्यावे लागेल. जेणेकरून वाहतुकीला अडथळे येणार नाहीत. याशिवाय, एमएसआरडीसीने परिसरातील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी पोलिसांच्या मदतीला १०० वाहतूक सहायक (वॉर्डन) उपलब्ध केले आहेत. महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करण्याचे सूचित करून या कामास गती दिली गेली आहे. नोकरदार व स्थानिकांच्या वाहनांसाठी गर्दीच्या काळात (पीक अवर) महामार्गावर अवजड वाहनांना प्रतिबंध असेल. या उपायांचे परिणाम आठवडाभरात दृष्टीपथास पडतील. नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या किमान ५० टक्के कमी होईल, असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला.