लोकसत्ता वार्ताहर
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा झाली. मळमळ व उलटीचा त्रास जाणवणाऱ्या मुलींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेवणानंतर जवळपास २२ मुलींना त्रास झाला. या प्रकरणी नंदुरबार प्रकल्प कार्यालयाने तातडीने तीन सदस्यीय समिती स्थापन केली असून ती अहवाल सादर करणार आहे.
चिंचपाडा येथील शासकीय आदिवासी वसतिगृहात ७३ मुली राहतात. बुधवारी नेहमी प्रमाणे मुलींनी मसुर उसळ, भात, चवळी दाळ , सोयाबीन वडी, आणि चपाती भोजन केले. त्यानंतर काही मुलींना मळमळ होऊन उलटीचा त्रास जाणवू लागला. याबाबत वसतिगृहातील मुलींनी वसतिगृहातील अधीक्षकेला सांगितले. वसतिगृहात इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या ७३ मुलींपैकी २२ मुलींना मळमळ उलटी चा त्रास जाणवू लागल्याने त्यांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. विसरवाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. प्रमोद वळवी, डॉ. अजयराज कुवर यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह विद्यार्थिनींवर उपचार केले.
आणखी वाचा-दिल्लीतील भारंगम आंतरराष्ट्रीय महोत्सवात नाशिकचा ‘कलगीतुरा’
यावेळी विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण हे पोलिस पथकासह दाखल झाले. एका मुलीला अस्वस्थ वाटत असल्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. बाकी २१ मुलींची प्रकृती स्थिर आहे असे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
आणखी वाचा-राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी प्रकल्प कार्यालयातील दोन सहाय्यक प्रकल्प अधिकारी व कर्मचारी यांचे पथक विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात व तेथून चिंचपाडा शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात तपासणीसाठी पाठविले असता प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत घडलेल्या प्रकाराची चौकशी केली. या विषबाधा प्रकरणी प्रकल्प कार्यालयाने तीन सदस्यीय समितीची नेमणुक केली असून ते अहवाल सादर करतील. या वसततिगृहाचा भोजन ठेका एका खासगी व्यक्तीस देण्यात आलेला आहे.