नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात कोणत्याही भागातून रस्ते मार्गाने नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांना सुखद व जलद प्रवासाची अनुभूती देण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. त्याकरिता नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे सहापदरीकरण, कॉक्रीटीकरण, नाशिक-दिंडोरी-वणी रस्त्यासह अन्य राज्य मार्गांचे मजबुतीकरण, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहराच्या सभोवताली वर्तुळाकार रस्त्याचे जाळे विणले जाणार आहे. या कामांसाठी तब्बल २२७० कोटींची आर्थिक तजविज राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
प्रयागराज कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांनी सहभाग नोंदविला होता. २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यातही भाविक उत्स्फुर्तपणे सहभागी होतील, हे गृहीत धरून नियोजनात व्यापक फेरबदल केले जात आहे. तयारीला कालावधी कमी असल्याने दीड ते दोन वर्ष लागणारी कामे तातडीने सुरू करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी म्हटले आहे. रस्ते, पूल, घाट व तत्सम कामांना जास्त वेळ लागतो .राज्याच्या अर्थसंकल्पात नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांच्या विविध कामांना मान्यता देऊन निधीची तरतूद करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने ७५९.२५ किलोमीटर रस्ते व पुलांची ५२ कामे प्रस्तावित केलेली आहेत. त्यास तीन हजार ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील महत्वाची बरिच कामे अर्थसंकल्पात समाविष्ट झाल्याचे सांगितले जाते. या व्यतिरिक्त महापालिकेने शहरात साडेतेरा किलोमीटरचे १७ नवीन रस्ते प्रस्तावित केले असून १८८ किलोमीटर जुन्या रस्त्यांच्या सुधारणांचे नियोजन केले आहे.
विविध रस्त्यांचा अंतर्भाव
त्र्यंबकेश्वर-नाशिक या ३० किलोमीटर मार्गाचे सहापदरीकरण व कॉक्रिटीकरणास (३५० कोटी) मान्यता मिळाली आहे. यात पालखी मार्गाचाही समावेश आहे. दिंडोरी-वणी-नांदुरी रस्ता रुंदीकरण (१०० कोटी), जानोरी अर्थात नाशिक विमानतळ ते राष्ट्रीय महामार्ग (५० कोटी), पेठ-हरसूल-त्र्यंबकेश्वर-पहिने (२०५ कोटी), त्र्यंबकेश्वर-धोंडेगाव-उमराळे-दिंडोरी-पालखेड-पिंपळगाव (२१५ कोटी) यांच्यासह अन्य वेगवेगळ्या ९१ किलोमीटरच्या रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. यातील बहुतेक रस्ते वर्तुळाकार मार्गाचा भाग आहे. वेगवेगळ्या भागातून रस्ते मार्गाने येणाऱ्या भाविकांना ये-जा करणे सुकर होईल. शिवाय, महामार्गावरून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांना शहरात येण्याची गरज भासणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे.