नाशिक – विविध वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहिलेल्या विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत २३.१६ टक्के मतदान झाले. नाशिक शहरातील केंद्रांवर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. धुळे जिल्ह्यात सर्वाधिक (२६.६५ टक्के) तर, अहमदनगरमध्ये सर्वात कमी (१९.९१ टक्के) मतदान झाले.
नाशिक विभागातील एकूण ९० केंद्रांवर मतदान होत आहे. यात नाशिक जिल्ह्यातील २९, अहमदनगर २०, जळगाव २०, धुळे १२ आणि नंदुरबार जिल्ह्यातील नऊ केंद्रांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण ६९ हजार ३६८ मतदारांची नोंदणी झाली आहे. यात सर्वाधिक २५ हजार ३०२ मतदार नाशिक जिल्ह्यातील आहेत.
हेही वाचा – नाशिक : जून महिन्यात डेंग्यूचे ९४ रुग्ण, आरोग्य विभागाकडून उपाययोजना
नाशिक शहरातील १० मतदान केंद्रांसह सटाणा, येवला, निफाडसह मालेगाव ग्रामीणमध्ये प्रत्येकी दोन तर देवळा, नांदगाव, चांदवड, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर आणि मालेगाव शहरात प्रत्येकी एक केंद्र आहे. सकाळपासून शहरातील अनेक केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. अनुदानित शाळांमधील शिक्षकांना मतदानासाठी सुट्टी दिली गेली असून विनाअनुदानित तत्वावरील शाळेतील शिक्षकांना मतदानासाठी दोन तासाची सवलत दिली गेलेली आहे.
हेही वाचा – नाशिक शिक्षक मतदारसंघात ९० केंद्रांवर मतदानास सुरुवात
निवडणूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार सकाळी सात ते ११ या वेळेत १६ हजार ६९ मतदारांनी मतदान केले. यात नंदुरबार जिल्ह्यात १४२१ मतदारांनी (२६.३५ टक्के), धुळे जिल्ह्यात २१७४ (२६.६५), जळगाव २६३१ (२०.०५ टक्के), नाशिक ६३८१ (२५.२२ टक्के) आणि अहमदनगर जिल्ह्यात ३४६२ मतदारांचा (१९.९१ टक्के) समावेश आहे. आपल्या हक्काचे मतदान करवून घेण्यासाठी राजकीय पक्ष व उमेदवारांची धडपड सुरू आहे. दरम्यान, राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत एकूण २१ उमेदवार असून शिवसेनेचे (शिंदे गट) किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, भाजपशी संबंधित अपक्ष विवेक कोल्हे या चौघांमध्ये मुख्य लढत होत आहे. शिक्षणसम्राट, साखर सम्राटांसारखे दिग्गज रिंगणात असल्याने निवडणुकीला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.