नाशिक : रविवारी रात्री फुलेनगर भागात नाकातोंडातून अकस्मात रक्तस्त्राव होऊन २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. न्यूमोनिया अर्थात फुफ्फुसातील संसर्ग आणि क्षयरोगाने (टीबी) त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले. आवाजाच्या भिंतींशी (डीजे) या घटनेचा कुठलाही संबंध नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. नितीन रणशिंगे (२३, फुलेनगर) असे या युवकाचे नाव आहे.
पंचवटीतील फुलेनगर भागातील तीन पुतळ्याजवळ रविवारी रात्री आठ वाजता हा प्रकार घडला. या ठिकाणी ध्वनिच्या भिंती उभारण्यात आल्या होत्या. आवाजाच्या दणदणाटाचा त्रास झाल्यामुळे त्याठिकाणी उभ्या असलेल्या नितीनच्या तोंडातून, नाकातून रक्त आल्याची साशंकता व्यक्त झाली होती. भाऊ आनंदा रणशिंगे यांनी त्यास तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच नितीनचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर या घटनेचा आवाजाच्या भिंतींशी कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. नितीन हा चार वर्षांपासून क्षयरोगाने आजारी होता. मुंबई नाका येथील एका डॉक्टरांकडे तो उपचार घेत होता. शवविच्छेदन अहवालात फुफ्फुसातील संसर्ग (न्यूमोनिया) आणि क्षयरोगाने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. याबाबतची माहिती पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.