देशभर प्राणवायूचे संकट गंभीर बनले असताना नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी प्राणवायूच्या टाकीची गळती होऊन हाहाकार उडाला. प्राणवायू न मिळाल्याने २४ करोनाबाधित रुग्णांना प्राण गमवावे लागले. या मृत्युतांडवामुळे हादरलेल्या काही नातेवाईकांनी अत्यवस्थ रुग्णांना मिळेल त्या वाहनाने अन्यत्र हलवले तर काहींनी बाहेरून सिलिंडर आणले. या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका चौकालगत पालिकेचे हे करोना रुग्णालय आहे. १५० क्षमतेच्या रुग्णालयात १५७ करोनाबाधित उपचार घेत होते. त्यातील १३१ जण प्राणवायू व्यवस्था तर १५ रुग्ण ‘व्हेंटिलेटर’वर होते. यातील ६१ रुग्णांची प्रकृती नाजूक होती. दुपारी बारा वाजेच्या सुमारास रुग्णांना पुरेशा दाबाने प्राणवायू मिळत नसल्याचे लक्षात आले. टाकीला गळती सुरू झाल्याने प्राणवायूची पातळी झपाट्याने कमी झाली. रुग्णालयात गोंधळ उडाला. रुग्णांवर उपचार करणारे आरोग्य कर्मचारी हादरले. नातेवाईकांनी तिसऱ्या मजल्यावरील कक्षात धाव घेतली. रुग्णांना वाचविण्यासाठी शक्य ते सर्व मार्ग अनुसरले. अत्यवस्थ रुग्णांना खांद्यावरून खाली आणले गेले. रुग्णवाहिकेची प्रतीक्षा न करता पाच रुग्णांना मिळेल, त्या वाहनाने अन्यत्र नेण्यात आले. रुग्णांसह नातेवाईकांची अस्वस्थता सुन्न करणारी होती.

दुर्घटनेनंतर काही वेळातच अन्य रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात धडकले. जिल्हा रुग्णालयातून तातडीने प्राणवायूचे सिलिंडर मागविण्यात आले. शक्य त्यांना प्राणवायू देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अग्निशमन दलाने प्राणवायूच्या टाकीवर पाणी फवारत गळतीची जागा शोधली. दीड, दोन तासांनी वाहिनीचा तो भाग दुरुस्त करण्यात आला. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. प्राणवायू पुरवठ्याअभावी २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. तांत्रिक दोषामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे ते म्हणाले. बरे होण्याच्या मार्गावर असलेल्या रुग्णांना गमावल्याने नातेवाईकांमध्ये संतापाची भावना होती. नातेवाईकांच्या रोषामुळे तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागल्याने रुग्णालय परिसरास पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. राजकीय नेत्यांची रीघ लागल्याने गोंधळात अधिक भर पडली. रुग्णांवरील उपचार सुरळीत करण्यात अडथळे आले.

सिलिंडरसाठी धावाधाव

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या अधिक असल्याचे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. व्हेंटिलेटर यंत्रणेत प्राणवायू अधिक दाबाने लागतो. प्राणवायू व्यवस्थेवर कमी दाब असला तरी रुग्ण तग धरू शकतो. रुग्णालयात काही मोठे सिलिंडर होते. गंभीर रुग्णांसाठी ते तात्काळ वापरले गेले. परंतु, त्यावरून पुरेशा दाबाने प्राणवायू गेला नसल्याचे ते सांगतात. यावेळी एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर इतरांचे नातेवाईक तेथील सिलिंडर थेट आपल्या रुग्णाकडे नेत होते, असे या दुर्घटनेत आजी गमावणाऱ्या विकी जाधव यांनी सांगितले.

तपासासाठी उच्चस्तरीय समिती

या दुर्घटनेचा तपास करण्यासाठी राज्य सरकार उच्चस्तरीय समिती नेमणार आहे. त्यात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, अभियांत्रिकी तज्ज्ञ आणि वरिष्ठ डॉक्टरांचा समावेश असेल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ यांनी रुग्णालयास भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन के ले. महापालिके च्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी जाहीर के ले. सायंकाळी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि कृषिमंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयास भेट दिली.

मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही देतानाच या दुर्घटनेवरून कुणी राजकारण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांना केले.

नाशिकची दुर्घटना धक्कादायक, मन हेलावणारी आहे. करोनाच्या रुग्णांना सावरण्याठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत असताना असे अपघात आघात करतात. मृतांच्या नातेवाईकांचे दु:ख मोठे आहे. त्यांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे.       – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 corona victims die at the hospital in nashik abn