स्थानिक राजकारणाची भविष्यातील दिशा निश्चित करणाऱ्या जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुकीत विविध गटातून तब्बल २४२० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून बुधवारी त्यांची छाननी होणार आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीसाठी सर्वाधिक ३०९ तर, सर्वात कमी म्हणजे २५ अर्ज सुरगाणा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल झाले आहेत. बहुतांश समित्यांमध्ये सहकारी संस्था आणि ग्रामपंचायत गटात इच्छुकांची मोठी संख्या आहे. छाननीनंतर २० एप्रिलपर्यत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. रिंगणातील स्पर्धक कमी करण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी होत आहे.प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बाजार समित्यांच्या निवडणुकीला मुहूर्त लागल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांनी रिंगणात उड्या मारल्या.
हेही वाचा >>> जळगाव : भरधाव अनियंत्रित ट्रॅक्टर नागरी वस्तीत; मुलगी जागीच ठार
अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आल्यानंतर प्रत्येक बाजार समितीतील उमेदवारांची संख्या उघड झाली. ती चकीत करणारी आहे. नाशिक, मालेगाव, मनमाड, येवला, नांदगाव, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सिन्नर, चांदवड, कळवण, दिंडोरी, घोटी, सुरगाणा व देवळा या बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. प्रत्येक समितीत सहकारी संस्था (११), ग्रामपंचायत (चार), व्यापारी (दोन) व हमाल-मापारी (एक) मतदारसंघ अशा एकूण १८ जागा आहेत. १४ बाजार समित्यांमधील एकूण २५२ जागांचा विचार करता सहकारी संस्था मतदारसंघात १४६१, ग्रामपंचायत मतदारसंघात ६७८, व्यापारी १८३ आणि हमाल-मापारी गटात ९८ असे एकूण २४२० अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी प्रक्रिया त्या त्या तालुक्यात बुधवारी होणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक (सहकारी संस्था) सतीश खरे यांनी सांगितले. सहा एप्रिल रोजी वैध अर्जांची यादी प्रसिध्द होईल. नंतर म्हणजे सहा ते २० एप्रिल या कालावधीत उमेदवार अर्ज माघारी घेऊ शकतात. अनेक ठिकाणी इच्छुकांची संख्या मोठी आहे. पॅनलची स्थापना आणि स्पर्धकांनी माघार घेण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे.
हेही वाचा >>> नंदुरबारमध्ये परिस्थिती पूर्ववत ; २५ हून अधिक जणांना अटक
सर्वात कमी अर्ज दाखल झालेल्या सुरगाणा बाजार समितीच्या निवडणुकीत हमाल-मापारी गटात कुणाचाही अर्ज नाही. नाशिक बाजार समितीत या गटात एकाच उमेदवाराने तीन अर्ज दाखल केले आहेत. हा अर्ज वैध ठरल्यास संबंधिताची बिनविरोध निवड होईल. अपवादात्मक स्थितीत अन्य काही बाजार समित्यांमध्ये व्यापारी व हमाल-मापारी गटात बिनविरोध निवडीचे प्रयत्न होऊ शकतात. मात्र सहकारी संस्था व ग्रामपंचायत गटात तशी सुतराम शक्यता नाही. राजकीय पक्षांशी संबंधित नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. संबंधितांनी परिपूर्ण पॅनल स्थापून प्रचाराला वेग देण्याची तयारी केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीनिहाय दाखल अर्ज
सुरगाणा – २५
देवळा – १४७
घोटी – १५९
पिंपळगाव बसवंत – ३०९
चांदवड – १९३
नाशिक – १७५
येवला – २१७
नांदगाव – १४८
सिन्नर – १८०
कळवण – १३२
मनमाड – १५०
मालेगाव – २०२
लासलगाव – २११
दिंडोरी – १७१