नाशिक – धुळे शहरातील हॉटेल कृष्णा रिसोर्ट येथील लग्न समारंभात चोरीस गेलेले २६ तोळे सोने राजगढ (मध्य प्रदेश) येथील जंगलात तब्बल नऊ दिवस तळ ठोकून झोपडीवजा घरातून हस्तगत केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आश्चर्य म्हणजे ज्यांच्याकडे १५ लाख ९० हजाराचे सोने मिळाले, ते पोलिसांना सापडले नाहीत.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी दोन डिसेंबर २०२४ रोजी हॉटेल कृष्णा रिसॉर्ट येथे झाली होती. एका लग्न सोहळ्यातील श्रीमंती पूजन आणि संगीताच्या कार्यक्रमावेळी ही चोरी झाली होती. प्रतिभा बोरसे यांच्या मुलीचा रात्री सव्वा नऊ वाजता विवाह होता. यावेळी प्रतिभा यांच्या पर्समधील त्यांचे स्वतःचे आणि नवरीचे असे २६ तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले. त्यात सोन्याचा हार, काप, बांगडया, तीन साखळ्या, रोख रक्कम तसेच मोबाईल हँडसेट अशा वस्तू होत्या. जवळपास १५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याने खळबळ उडाली होती.
हा कार्यक्रम चालू असतांना एक लहान मुलगा आणि मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तींनी या किंमती वस्तू चोरल्याचा संशय व्यक्त करत प्रतिभा बोरसे यांनी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा >>> प्रयोगशाळेपासून मैदान, सर्वांचीच वानवा; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या मागण्या
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे प्रभार अधिकारी शशिकांत पाटील यांना या गुन्ह्याचा तपास लावण्याचा आदेश दिला होता. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलीस ठाणे आणि अकोला जिल्ह्यात देखील अशाच प्रकारे गुन्हे दाखल असून चोरी करण्याची पध्दतही एकसारखीच असल्याने शशिकांत पाटील यांनी माहिती काढली. यासाठी त्यांनी अशोक पायमोडे, प्रकाश जाधव व मनिष सोनगिरे यांचे विशेष पथक स्थापन केले. हे पथक मध्य प्रदेशातील राजगढ जिल्हयात पोहोचले. बोडा पोलीस ठाणेअंतर्गत सांसीकढीया, गुलखेडी येथे या गुन्ह्याचे धागेदोरे असल्याची खात्री झाल्यावर या पथकाने नऊ दिवस मुक्काम ठोकला. आणि चोरी करणाऱ्या गौरव सांसी, सावंत ऊर्फ चप सांसी, कालू सांसी आणि बबलू सिसोदिया (सर्व रा. हुलखेडी, गुलखेडी, राजगढ, मध्य प्रदेश) यांचा शोध सुरु केला. चौघेही तेथे नसल्याने त्यांच्या नातेवाईकांकडून माहिती काढली. चौघेही संशयित गुलखेडी गावाकडे जाणा-या रस्त्यालगत असलेल्या जंगलात झोपडीवजा घरात वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक संबंधित ठिकाणी पोहोचले.
हेही वाचा >>> भुसावळ-दादर दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ; पश्चिम रेल्वे प्रशासनाचा निर्णय
पोलीस आल्याचे पाहताच चौघेही संशयित फरार झाले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता धुळ्यातील विवाह सोहळ्यात चोरी गेलेला मुद्देमाल या ठिकाणी आढळला. यात २६ तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे,धुळे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या सुचना व मार्गदर्शनावरून मोहाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांच्यासह विशेष पथकाने ही कामगिरी पूर्ण केली.