नाशिक – शहरातील विविध समस्यांविषयी महापालिकेवर तक्रारींचा भडीमार होत असून इ कनेक्ट ॲपसह मुख्यमंत्री सचिवालय, विभागीय आयुक्त, आपले सरकार यावरून आतापर्यंत २६४४ तक्रारी आल्या आहेत. यातील जवळपास निम्म्या तक्रारी अतिक्रमणाशी संबंधित आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेच्या साप्ताहिक आढावा बैठकीत मुख्यमंत्री सचिवालय, पीएम पोर्टल, आपले सरकार, एनएमसी इ कनेक्ट ॲप या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारींची सद्यस्थिती मांडली गेली. महापालिकेच्या कामकाजात सुधारणा करून नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी कृती आराखडा करण्यात आला आहे. त्यात तक्रारींचा जलद निपटारा करण्यावर भर दिला गेला. नागरिक प्रामुख्याने इ कनेक्ट ॲपवरून तक्रारी करीत असल्याचे दिसून येते. या ॲपवरील तक्रारींची संख्या २५७७ इतकी आहे. यात अतिक्रमणशी संबंधित १२६८, घनकचरा व्यवस्थापन २५२, मलनिस्सारण १७७, उद्यान ८५, नगर नियोजन १७७, झोपडपट्टी ६६, सार्वजनिक बांधकाम १८३ या विभागांशी संबंधित तक्रारींची संख्या अधिक आहे. संबंधित विभागांना तक्रारींचा मुदतीत निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले.

दरम्यान, इ कनेक्ट ॲपवर तक्रारींवरील कार्यवाहीची माहिती द्यावी लागते. कधीकधी मोघम उत्तर वा कारवाई दर्शवत तक्रारी बंद केल्या जातात. अथवा तक्रार अन्य विभागाशी संबंधित असल्याचे सांगून टोलवाटोलवी होते, असे तक्रार करणाऱ्या नागरिकांचे म्हणणे असते.

विभागीय कार्यालयांविषयी तक्रारी मुख्यमंत्री सचिवालयाकडील १०, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून एकूण १७, पीजी पोर्टलवरील १२, आपले सरकार पोर्टलवरून २८ तक्रारी आल्याची माहिती बैठकीत मांडली गेली. यात नगरनियोजन, अतिक्रमण, शिक्षण, भूसंपादन, विभागीय कार्यालये, उद्यान आदी विभागांशी तक्रारींचा समावेश आहे. यामध्ये विभागीय कार्यालयांशी संबंधित सुमारे २५ तक्रारी आहेत. विभागीय कार्यालयांचे कामकाज कर्मचाऱ्यांच्या लहरींवर चालते. स्वागत कक्षात जबाबदारी सांभाळणारे कर्मचारी कार्यालयीन वेळेत अंतर्धान पावतात. कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी अकस्मात भेटीचे सत्र सुरू केल्यामुळे या प्रकारांना काहीअंशी आळा बसत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2644 complaints against nashik municipal corporation half of the complaints related to encroachment zws