सुखोई लढाऊ विमानांची बांधणी करणाऱ्या ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) ताब्यात असणाऱ्या हजारो एकर जागेपैकी २६५ एकर क्षेत्राच्या मालकी हक्काचे दस्तावेजच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. एचएएलने आपली चार हजार ६२० एकर जागा भिंत उभारून संरक्षित केली. तथापि, ही भिंत तोडण्याचे प्रकार घडत असतात. या स्थितीत अतिक्रमण वा जागेशी संबंधित काही विषय उपस्थित झाल्यास संरक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण अशा या कारखान्याला बाजू मांडणे अवघड होईल, असा मुद्दा लेखा परीक्षणात उपस्थित झाला आहे. कोटय़वधींच्या मालमत्तेची आवश्यक ती कागदपत्रे या कारखान्याकडे उपलब्ध नसल्यावर यानिमित्ताने प्रकाश पडला आहे.
नवरत्नांच्या यादीत समाविष्ट असलेल्या एचएएलचे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कारखाने असून त्यांच्याकडे मोठय़ा प्रमाणात जागा आहे. काही ठिकाणी एचएएलच्या जागेवर अतिक्रमणही झाले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील या सार्वजनिक उद्योगासाठी त्या त्या राज्यातील शासनाने जागा उपलब्ध करून दिली. हजारो एकरच्या स्वरूपात असणाऱ्या जमिनींच्या मालकी हक्काच्या कागदपत्रांचे जतन करताना कंपनीच्या मिळकत व्यवस्थापनाची दमछाक झाल्याचे दिसते. लेखा परीक्षणात महालेखाकारांनी याच कार्यशैलीवर बोट ठेवले. नाशिक शहरापासून २४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ओझर येथे १९६४ मध्ये एचएएल कारखान्याची उभारणी झाली. लढाऊ विमानांचा हा कारखाना आहे. त्यासाठी दोन लाख चौरस मीटर क्षेत्रावर अद्ययावत संकुलांची उभारणी करण्यात आली. सहा दशकांहून अधिक काळ लोटूनही या कारखान्यास जमिनीशी संबंधित कागदपत्रांचे योग्य व्यवस्थापन करणे शक्य झाले नसल्यावर महालेखाकारांनी आक्षेप नोंदविला आहे. सुखोई विमानांची बांधणी, हवाई दलाच्या विमानांचे नूतनीकरण, लढाऊ विमानाशी संबंधित सुटय़ा भागांचा देशांतर्गत व विदेशात पुरवठा हे काम या प्रकल्पामार्फत केले जाते. एचएएलकडे सद्य:स्थितीत चार हजार ६२० एकर आणि १३ गुंठे जागा आहे. त्याचे सीमांकन करून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अवाढव्य परिसरात संरक्षक भिंत उभाण्यात आली. एकूण जागेपैकी चार हजार ३५४ एकर जागेच्या मालकीशी संबंधित कागदपत्रे कंपनीकडे उपलब्ध आहेत. उर्वरित २६५ एकर १७ गुंठे जागा ताब्यात असली तरी त्याबाबतची कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे अहवालात म्हटले आहे. या संदर्भात मिळकत व्यवस्थापन विभाग महाराष्ट्र शासनाशी पत्रव्यवहार करत आहे. परंतु एचएएलचे या अनुषंगाने दिलेले उत्तर मान्य करता येण्याजोगे नसल्याचे अहवालात नमूद आहे.
एचएएलने संपूर्ण जागेला संरक्षक भिंत उभारली असली तरी आसपासच्या ग्रामस्थांकडून भिंत तोडण्याचे प्रयत्न वारंवार होतात. यामुळे ही जागाही अतिक्रमणाच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जमिनीशी संबंधित संपूर्ण दस्तावेज परिपूर्ण ठेवण्याचे सूचित करण्यात आले आहे. एचएएल व्यवस्थापन देशातील संपूर्ण जागांचे दस्तावेज आग प्रतिबंधक विभागात जतन करते. जवळपास तीन हजार पाने केवळ ‘अवॉर्ड कॉपी’ आणि इतर नोटिफिकेशन, नकाशांचे आहेत. चार ते पाच दशके जुन्या असणाऱ्या दस्तावेजांचे जतन करणे गरजेचे आहे. त्यासाठी या सर्व कागदपत्रांचे ‘डिजिटलायझेशन’ करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. या संदर्भात एचएएलच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता याबाबत काही माहिती देता येणार नसल्याचे सांगितले. कंपनीच्या मिळकत व्यवस्थापकाशी दूरध्वनीद्वारे वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.
‘एचएएल’च्या २६५ एकरावरील मालकी हक्काचे दस्तावेज अनुपलब्ध
एचएएलने आपली चार हजार ६२० एकर जागा भिंत उभारून संरक्षित केली. तथापि, ही भिंत तोडण्याचे प्रकार घडत असतात.
Written by अनिकेत साठे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-04-2016 at 02:27 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 265 acres land ownership documents of hindustan aeronautics limited unavailable