लोकसत्ता वार्ताहर
धुळे : शहरात ५५ हजार रुपयांच्या घरपट्टी धारकाला २७ लाख रुपयांची नोटीस, तर दोन हजार ५०० रुपये घरपट्टी धारकाला ५२ हजार रुपयांची नोटीस बजावण्यात आली. महानगर पालिकेच्या अवाजवी मालमत्ता करांच्या नोटिसांमुळे धुळेकर हैराण झाले असून तातडीने वाढीव मालमत्ता कर हटवावा, महापौरांनी ठराव करावा. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याची माहिती माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय गुजराथी यांनी दिली.
गुजराथी यांनी पत्रकार परिषद घेत महापालिकेच्या भोंगळ कारभारावर टीका केली. मनपा प्रशासनाने नियमबाह्य पध्दतीने धुळेकरांवर मालमत्ता कर लावला आहे. एकही सुविधा नियमितपणे न देवू शकणार्या मनपाने मालमत्ता कराबाबत राज्यात इतिहास रचला आहे. राज्यातील अ ते ड वर्ग मनपा आणि धुळे मनपाच्या मालमत्ता करामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. मालमत्ता कर आकारणीच्या ठेक्याचे काम एका वर्षात पूर्ण होवू शकले असते, परंतु, असे असताना पाच वर्षांसाठी १० कोटी रुपयांचा ठेका दिलाच कसा, असा प्रश्न गुजराथी यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा-शाळा, महाविद्यालयांबाहेर टवाळकी करणाऱ्यांनो सावधान, धुळे पोलीस अधीक्षकांची विशेष मोहीम
शहराबाहेर असलेल्या विराज स्टाईल्सला ५५ हजार रुपये मालमत्ता कर होता, आता तो साडेचार लाख रुपये करण्यात आला आहे. करापोटी तब्बल २७ लाखांची नोटीस मनपाने त्यांना पाठवली आहे. कर आकारणीने धुळ्यातील मालमत्ता धारक हवालदिल झाले आहेत. ठेका दोन वर्षापूर्वी दिला गेला. परंतु, त्याआधीपासूनची देयके दिली गेली. महापालिकेत ३१ डिसेंबरपर्यंत भाजपची सत्ता आहे. महापौरांनी महासभा घेवून ठरावाद्वारे धुळेकरांची आर्थिक अत्याचारातून सुटका करावी, असे साकडे गुजराथी यांनी महापौरांना घातले आहे.