जळगाव : महायुती सरकारने एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर करून त्याअंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटूंबातील महिलांना यंत्रमागावर विणलेली साडी मोफत देण्याची योजना दीड वर्षांपूर्वी आखली होती. आगामी पाच वर्षांसाठी प्रति लाभार्थी दरवर्षी एक साडी याप्रमाणे वाटपाचे नियोजन असताना, आतापर्यंत एकदाच साडी वाटली गेली. निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे साड्या वाटप झाले नसल्याचे कारण देण्यात आले. परंतु, आचारसंहिता संपल्यानंतरही अद्याप साडी वाटपास सुरुवात न झाल्याने उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांत २९ हजार ५५९ साड्या वाटपावाचून पडून आहेत.

रास्तभाव दुकानांमधून राज्यातील २४ लाख ५८ हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटूंबांना साडी वाटपाची तयारी शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाने केली होती. नंतरच्या काळात लोकसभेसह विधानसभेची निवडणूक काही महिन्यांच्या अंतराने लागोपाठ झाल्याने शासनाने आखलेला साडी वाटपाचा कार्यक्रम दोन वेळा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडला.

हेही वाचा…मंत्रीपद न मिळणे हा नियतीकडून अपमान, माणिकराव शिंदे यांचा भुजबळ यांना चिमटा

शासन आदेशावरून रास्तभाव दुकानांमधून साडी वाटप थांबविण्यात आल्यानंतर अनेक महिला लाभापासून वंचित राहिल्या. उत्तर महाराष्ट्रातील चारही जिल्ह्यात वाटपासाठी चार लाख, ९३ हजार ३६३ साड्या देण्यात आल्या होत्या. त्यापैकी जळगाव जिल्ह्यात एक लाख ३४ हजार ९०० अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना साड्या देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी तब्बल १० हजार लाभार्थींना अजूनही साड्या मिळालेल्या नाहीत. शासनाची परवानगी घेऊन आता शिल्लक साड्यांचे वाटप केले जाणार असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
धुळे जिल्ह्यात ७५, ७३४ लाभार्थ्यांना साड्यांचे वितरण करण्यात येणार होते. त्यापैकी ६८, ७२२ साड्यांचे वाटप झाले. तर, ७,०१६ साड्या शिल्लक आहेत. नाशिक जिल्ह्यात एक लाख, ७६ हजार ५५२ साड्या वाटपाचे उद्दिष्ट असताना एक लाख, ६८ हजार ६६७ साड्यांचे वाटप झाले. शिल्लक ७८८५ साड्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यात एक लाख, सहा हजार १७७ साड्या वाटपासाठी मिळाल्या असताना एक लाख, एक हजार ५१९ साड्यांचे वाटप झाले. ४६५८ साड्या पडून आहेत.

हेही वाचा…येवला बाजार समितीत शेतकऱ्यांकडून लिलाव बंद, मनमाड रस्त्यावर ठिय्या

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमधून साडी वाटप थांबविण्यात आले होते. त्यामुळे सुमारे १० हजार साड्या शिल्लक राहिल्या असून, शासनाने परवानगी दिल्यानंतर त्यांचे वाटप सुरू केले जाईल. नवीन साडी वाटपाविषयी कोणतीच माहिती नाही. संजय गायकवाड (जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव)

Story img Loader