नाशिक:जिल्ह्यातील वणी-नांदुरी मार्गावर मोहनदरी फाट्याजवळ टेम्पो उलटून झालेल्या अपघातात २९ भाविक जखमी झाले. यातील पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजता हा अपघात झाला. जखमी हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील असून सध्या ते नाशिकच्या पाथर्डी भागात वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते.

नवस फेडण्यासाठी पाथर्डी येथील काही कुटुंबिय नातेवाईकांसह सकाळी दोन वाहनांतून सप्तश्रृंगी गडाकडेे निघाले होते. वणीवरून नांदुरीकडे जात असताना दरेगावलगतच्या मोहनदरी फाटा भागात वळणावर टेम्पो अपघातग्रस्त झाला. वळणाचा अंदाज न आल्याने नियंत्रण सुटून टेम्पो उलटला. टेम्पोत लहान-मोठ्यांसह २९ जण होते. अपघाताची माहिती मिळताच वणी आणि नांदुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिक ग्रामस्थही मदतीला आले. रुग्णवाहिकांमधून जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. काहींच्या डोक्याला मार लागला आहे. अन्य जखमींना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती वणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार दुसाने यांनी दिली.

हेही वाचा
धुळे गुंतवणूक परिषदेत ८४३६ कोटींचे करार

जखमींमध्ये पाच बालकांचा समावेश

जखमींमध्ये दोन ते सात वर्ष वयोगटातील पाच बालकांसह १२ महिलांचा समावेश आहे. जखमींमधील अनेक जण नाशिक येथील रहिवासी असून उर्वरित त्यांचे वाशीम जिल्ह्यातील नातेवाईक आहेत. वणी ग्रामीण रुग्णालयाने दिलेल्या यादीनुसार जखमीमध्ये आशाताई खडसे, रोशनी बांगरे, प्रियांश जाधव, खुशी बोलकर, तनु खंदारे, अनिल बोरकर, अयोध्या जाधव, विलास पारवे, नंदा पारवे, ओम गायकवाड, प्रणय गायकवाड, गणेश बोरकर, हर्षदा बोरकर, शारदा बोरकर, अंबादास बोरकर, रंजना हिवराळे, सखाराम पारवे, राधा पारवे, मनकणीबाई खरांदे, मनिषा बोरकर, गणेश बांगरे, छाया तांबे, एकनाथ हिरवाळे, शिवानी खंदारे, अर्चना पालवे, शोभा खंदारे यांचा समावेश आहे. यातील पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. काहींच्या हाडांना मार तर, काहींच्या डोक्याला मार लागला आहे. पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे डॉ. तुषार दुसाने यांनी सांगितले.