लोकसत्ता वार्ताहर

मालेगाव: गेल्या काही दिवसापासून मालेगाव महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेस आता वेग आला आहे. किदवाई रस्ता, नवीन बस स्थानक परिसरातील तब्बल २९७ अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यामुळे या भागातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

प्रारंभी अतिक्रमण निर्मूलन पथकाने नंदन टॉवर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल आणि त्यानंतर एटीटी हायस्कूल ते नवीन बस स्थानकापर्यंत फेरी काढत लोकांना अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देऊन दोनशेच्यावर अतिक्रमण धारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली. त्यानंतर पथकाने कारवाई सुरु केली. त्यात वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर आणि गटारीवर केलेली कच्ची व पक्की अतिक्रमणे काढण्यात आली. तसेच पुन्हा अतिक्रमण करू नये अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला. यावेळी पथकाने अतिक्रमण काढल्यानंतर काही साहित्य जप्त केले.

हेही वाचा… नाशिक : जैविक कचरा टाकल्याबद्दल २५ हजारांचा दंड

महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी, उपायुक्त राजू खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक तीनच्या पथकाने अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई केली. सहाय्यक आयुक्त हरिष डिंबर, प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर व भरत सावकार,अतिक्रमण निर्मूलन विभागाचे बिट निरीक्षक दत्तात्रेय काथेपुरी,भरत कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader