लोकसत्ता वार्ताहर
मनमाड : शहरातील रेल्वे उड्डाण पुलाचा काही भाग कोसळल्याने इंदुर-पुणे महामार्गावरील मनमाड शहरातून जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यासाठी या उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूला रेल्वे पुलाच्या पोहच मार्गापर्यंत संरक्षक भिंत बांधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तीन कोटी रुपयांचा तातडीचा निधी मंजूर केला आहे.
शहरातील इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूल खचल्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक प्रशासनाने बंद केली असून त्यामुळे सर्वदूर वाहतुकीची कोंडी होत आहे. प्रामुख्याने रेल्वे जंक्शनमुळे मनमाड येथून शिर्डीकडे जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली आहे. स्थानिकांचा नेहमीच्या कामासाठी संपर्कही खंडित झाला आहे. प्रामुख्याने रुग्णांना शहरातील विविध रुग्णालयांत आणण्यासाठी कॅम्प येथून गावात येण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. नगर, पुणे येथे जाण्यासाठी मनमाडचा मार्गच बंद झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना ‘द्राविडी प्राणायाम’ करत लांबच्या मार्गाने म्हणजे नांदगाव किंवा लासलगावमार्गे येवला-नगर-शिर्डी-पुणे असे जावे लागत आहे. नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, अमळनेर, धुळे व मालेगाव येथून मनमाडमार्गे पुण्याला जाणाऱ्या सर्व बस सध्या नांदगावमार्गे जात आहेत. म्हणजे वाहतूक वळवल्याने मनमाडला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. याप्रश्नी नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांची भेट घेतली. मालेगांव, मनमाड, कोपरगांव रस्त्यावरील मनमाड शहरांतून जाणाऱ्या उड्डाण पुलाला संरक्षक भिंत बांधण्यास मंजूरी द्यावी, त्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती.
आणखी वाचा-नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक आक्रमक, लिलाव बंद पाडून कांदा निर्यात बंदीचा निषेध
नागपूर अधिवेशन सुरू असतांना सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांनी मालेगांव-मनमाड-कोपरगांव रस्त्यावरील मनमाडमधील रेल्वे पुलाच्या पोहोच मार्गापर्यंत संरक्षक भिंत बांधण्यासाठी तीन कोटींच्या निधीस मंजूरी दिली. तातडीचा निधी मंजूर झाल्यामुळे या पुलाचे बांधकाम येत्या सव्वा महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या मालेगांवहून नांदगावमार्गे येवला तसेच येवल्याहून लासलगावमार्गे मालेगांव अशी सध्या सुरू असलेली वाहतूक, त्यामुळे पडणारा अतिरिक्त ताण लवकरच कमी होणार आहे. तातडीने पूल दुरूस्त होणार असल्याने मनमाड शहरांतील दक्षिण व उत्तर भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे उड्डाण पुलाची ढासळलेली भिंत व त्यामुळे निर्माण झालेली वाहतुकीची गंभीर समस्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदे व सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी गांभीर्याने लक्ष देऊन अवघ्या चारच दिवसात तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यावरून राज्य सरकारची कार्यक्षमता सिध्द झाली आहे. -सुहास कांदे (आमदार, नांदगाव)