मुंबई-आग्रा महामार्गावरील वडाळीभोई गावातील उड्डाण पूलावर शुक्रवारी सकाळी मालमोटारीखाली चिरडून एका महिलेसह तिघे ठार झाले. मालमोटार अंगावर येत असल्याने पाहून पुलावरून २५ फूट खाली उडी मारणारे तीन जण गंभीर जखमी झाले.
या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत वाहतूक बंद पाडली. वडाळीभोई गावातून जाणाऱ्या महामार्गावरील उड्डाण पुलावर सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. थांबा नसल्याने ग्रामस्थांना बस पकडण्यासाठी उड्डाण पुलावर जावे लागते. सकाळी काही ग्रामस्थ आणि युवक नेहमीप्रमाणे बसची प्रतीक्षा करत होते. नातेवाईकांना सोडण्यासाठी एक जण दुचाकी घेऊन आले. या वेळी भरधाव मालमोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि तिने कठडय़ालगत उभ्या असणाऱ्यांना चिरडले. पुलाच्या पुढील बाजूस काही युवक उभे होते. मालमोटार आपल्या अंगावर येत असल्याचे पाहून त्यांनी खाली उडी मारली. या अपघातात मालमोटारीखाली सापडून बाजीराव खंडेराव ठाकरे (७०, नांदूरटेक चांदवड), दिलीप गांगुर्डे व त्यांच्या पत्नी रंजनाबाई (पिंपळनेर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पुलावरून उडय़ा मारणारे सागर निवृत्ती आहेर, थॉमस अ‍ॅन्थोनी व थॉमस कुरवले हे जखमी झाले. गावात बस थांबा करून स्थानिकांची उड्डाण पुलावर जाण्यापासून मुक्तता करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी महामार्गावर आंदोलन केले.

Story img Loader