लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकरी रस्त्यानजीकच्या शेतात शुक्रवारी रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास दोन तरुणांवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह पोलीस पथकाने धाव घेत जखमी तरुणांना गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले की, भुसावळ तालुक्यातील साकरी फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळील शेतात अज्ञात तीन जणांनी भुसावळ येथील दोन तरुणांवर गावठी बंदुकीतून दोन फैरी झाडल्या. ही घटना शुक्रवारी रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास घडली. हल्लेखोरांच्या गोळीबारात अक्षय सोनवणे (26, भुसावळ) व मंगेश काळे (24, भुसावळ) जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला व पोटाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा…. जळगाव : तलाठ्यासह कोतवाल लाच घेताना जाळ्यात

हेही वाचा…. शिंदखेड्यातील व्यापाऱ्याची फसवणूक; गुजरातच्या दोघांविरुद्ध गुन्हा

अक्षय सोनवणे, मंगेश काळे दुचाकीने जेवणासाठी निघाले. साकरी फाट्यानजीकच्या उड्डाणपुलाजवळील शेतात दोघांवर हल्लेखोरांनी गावठी बंदुकीतून दोन फैरी झाडल्या. त्यात दोघेही तरुण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे, सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे आणि कर्मचार्‍यांनी धाव घेतली. अक्षय सोनवणेच्या पोटाला, तर मंगेश काळेच्या डोक्याला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती असून, दोघांवरही गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेत, कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader