लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : वृद्ध आणि त्यातही एकाकी राहणाऱ्यांच्या जीवनात कशा समस्या येतील, हे सांगता येत नाही. या समस्या सोडविण्यासाठी त्यांना होणारा मानसिक ताण तब्येतीसाठीही धोकादायक असतो. संबंधित व्यक्ती वृध्द आणि एकटी असल्याने, यंत्रणेकडूनही त्यांच्या समस्येकडे फारशा गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा अनुभव शहरातील इंदिरानगरमध्ये बापू बंगल्याजवळ राहणाऱ्या सुनंदा चितळे यांना आला. आलेल्या अनुभवामुळे त्या प्रचंड व्यथित झाल्या आहेत.
सुनंदा चितळे या एकट्या राहतात. सोमवारी पहाटेपासून मंगळवारी सकाळपर्यंत तब्बल ३० तास विजेवाचून त्यांचे हाल झाले. सर्व कामे ठप्प झाली. महावितरणच्या बेपर्वाईने तीन मिनिटांच्या कामासाठी चक्क ३० तास त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
आणखी वाचा-आदिवासींना वाचविण्याची युवापिढीवर जबाबदारी, युवा संवादमध्ये अंतरसिंग आर्या यांचे आवाहन
सोमवारी पहाटे चार वाजता त्यांच्या बंगल्यातील वीज पुरवठा खंडित झाला. सकाळी साधारण ६.३० वाजता त्यांनी इंदिरानगरच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क केला. त्यानंतर, तुमची तक्रार नोंदवली असून आमचे कर्मचारी येतील, असे त्यांना सांगण्यात आले. त्याप्रमाणे सकाळी १०च्या सुमारास कर्मचारी आले. प्रवेशद्वाराच्या बाहेरूनच त्यांनी, आम्ही दोष कुठे आहे ते शोधत असल्याचे त्यांनी सांगितले. थोड्या वेळाने ते निघून गेले. दुपारी महावितरणशी अनेकदा दूरध्वनी करूनही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी संध्याकाळी सहा नंतर दूरध्वनीला प्रतिसाद मिळाला. कार्यालयाकडून दोन कर्मचारी पाठविण्यात आले. त्या दोघांनी, विजेच्या खांबावर दोष असून आता अंधारात काम होणार नसल्याने उद्या सकाळी होईल, असे सांगून तेदेखील निघून गेले.
दरम्यान, वीज न आल्याने चितळे यांना रात्र अंधारातच काढावी लागली. मंगळवारी सकाळी त्यांनी पुन्हा महावितरण कार्यालयास दूरध्वनी केला. अर्ध्या तासात माणसे येतील, असे सांगण्यात आले. कोणीही आले नाही. शेवटी महावितरण कार्यालयातील एका अधिकाऱ्याचा दूरध्वनी नंबर त्यांना मिळाला. त्यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी माणसे पाठवली. तोपर्यंत नऊ वाजले होते. त्यांनी तीन मिनिटात वीज प्रवाह सुरू केला. कार्बन जमा झाल्याने वीज गेली होती, असे निष्पन्न झाले.
पावसामुळे कामाला मर्यादा
सध्या पावसामुळे कामात अडचणी येत आहेत. चितळे यांची तक्रार आल्यावर लगेच कामाला सुरूवात केली. परंतु, पावसामुळे कामात मर्यादा येतात. दोष शोधण्यात वेळ गेला. जाणीवपूर्वक उशीर केलेला नाही. त्या परिसरात केवळ त्यांची तक्रार होती. ती सोडविण्याचा प्रयत्न केला. -अधिकारी, महावितरण