कुंभमेळ्यासाठी पोलिसांनी वितरित केलेल्या हजारो पासचे कवित्व अद्याप सुरू असून पहिल्या पर्वणीत या पासला फारशी किंमत दिली गेली नसल्याची ओरड झाल्यामुळे यंत्रणेने आता कर्मचारी या कामात ‘पास्’ होण्यासाठी त्यांना पाठ देण्यास सुरूवात केली आहे. सिंहस्थासाठी वेगवेगळ्या प्रकारचे थोडे थोडके नव्हे तर, तब्बल ३० हजार पास वितरीत झाले आहेत. तथापि, त्यात मोठय़ा प्रमाणात दुजाभाव झाल्याची तक्रार आहे. त्यातही, पर्वणीच्या दिवशी या पासला बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांनी फारसे महत्व दिले नाही. याबद्दल ओरड झाल्यानंतर आगामी पर्वणीत तसे काही घडू नये म्हणून बंदोबस्ताच्या नियोजनातील बदल समजावून देताना कोणते पास कशासाठी दिले गेले, याबद्दल विशेषत्वाने मार्गदर्शन केले जात आहे.
पहिल्या पर्वणीवेळी भाविक व शहरवासीयांना झालेल्या त्रासाबद्दल बरीच आगपाखड झाल्यावर पोलीस यंत्रणेने पुढील पर्वणीसाठी काही बदल केले आहेत. पर्वणी काळात जवळपास १५ हजार पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला जातो. बंदोबस्तासंबंधी माहिती देण्यासाठी पोलिसांनी आधी या सर्वाना तितक्या मार्गदर्शन पुस्तिकांचे वाटप केले होते. त्या पुस्तिकांद्वारे आधी दिली गेलेली माहिती आणि आता झालेले फेरबदल यात काही अंतर पडू शकते. त्यामुळे नव्या बदलाची माहिती देण्याचे काम अधिकारी वर्गाकडून सुरू झाले आहे. कुंभमेळ्यासाठी जवळपास ३० हजार पासचे वितरण झाले. त्यात लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, स्वयंसेवक आदींचा समावेश आहे. अलीकडेच झालेल्या बैठकीत पासच्या कारणावरून अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांनी आपण वगळता एकाही सदस्याला पास दिला नसल्याची तक्रार केली. काँग्रेसच्या आ. निर्मला गावित यांनी पास असुनही पोलिसांनी आपल्या वाहनास त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश दिला गेला नसल्याची तक्रार केली. नाशिकमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ठिकठिकाणी अडवणूक झाल्याची तक्रार केली. या पाश्र्वभूमीवर, यंत्रणेला आपल्या कर्मचाऱ्यांना आपणच वितरित केलेल्या पासचे महत्व अवगत करून देण्यासाठी पुढाकार घेणे क्रमप्राप्त ठरले आहे.
कुंभमेळ्यासाठी वेगवेगळ्या स्वरुपाचे पास वितरित करण्यात आले आहे. त्यात रामकुंड व गोदावरी नदीवरील सर्व घाटांसह सर्वत्र ग्राह्य ठरेल, यासाठी पिवळ्या रंगाचा तर रामकुंड प्रतिबंधित क्षेत्र सोडून पिवळ्या रंगाचा पास दिला गेला. वाहनांसाठी स्वतंत्र पास आहेत. सर्व ठिकाणी ग्राह्य ठरणारा पिवळ्या रंगाचा शासकीय वाहनांना, वाहन प्रतिबंधित क्षेत्रात ग्राह्य नसलेला पण प्रशासकीय मार्गाचा वापर करू शकता येईल यासाठी शासकीय वाहनांना पांढऱ्या रंगाचा, मीडिया दुचाकी वाहनासाठी लाल तर
गुलाबी रंगाचा पास दिंडोरी बाजार समिती आणि शिवाजी स्टेडिअम असे वेगवेगळे पास दिले गेले आहे. या पासची रंगावरून ओळख करावी, याबद्दल बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना मार्गदर्शन केले जात आहे.
पोलिसांना ‘पास’ होण्यासाठी धडे
पर्वणीच्या दिवशी या पासला बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांनी फारसे महत्व दिले नाही.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-09-2015 at 01:52 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 30 thousand pass distributed for kumbh mela