धुळे: जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचा परिणाम आगामी काळात जिल्ह्यातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईचा आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यात आगामी वर्षात ३०२ गावे, ३९ वाड्यांना टंचाईची झळ बसणार आहे. ही टंचाई विचारात घेऊन नऊ कोटी ७६ लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला असून त्यात ३४४ उपाय योजनांचा समावेश आहे.
जिल्ह्यात या वर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यात परतीच्या पावसाने पाठ फिरवली. शिवाय सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा तडाखा जाणवला. जिल्ह्यात सरासरी ५३५.१० मिमी पाऊस अपेक्षित आहे. तुलनेत ४३३.७० मिमी म्हणजेच सरासरीच्या तुलनेत ८१.१० टक्के पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यात टंचाईचे सावट आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या संयुक्त आढाव्यानुसार टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.
हेही वाचा… नाशिक शहरात पुन्हा जलसंकट; नाशिकरोड विभागात दोन दिवस पाणी पुरवठा बंद
ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अशा तिमाहीनुसार टंचाई आणि आराखडा तयार करण्यात आला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या पहिल्या तिमाहीत शिंदखेडा व साक्री तालुक्यातील १६८ गावे, एका वाडीत टंचाईची शक्यता आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान शिरपूर वगळता तीन तालुक्यातील ७२ गावे, चार वाड्यांमध्ये टंचाईची शक्यता आहे. तर एप्रिल ते जून या तीन महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात ६२ गावे, ४० वाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होणार आहे.
सध्या शिंदखेडा तालुक्यात सप्टेंबरपासूनच टंचाई आहे. त्यामुळे एका गावाला टँकरने पाणी पुरवठा होत आहे. तर ३० गावांमध्ये विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. संभाव्य पाणी टंचाई विचारात घेत टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.