नाशिक – मणिपूर हिंसाचार निषेधार्थ सटाणा येथे शनिवारी काढण्यात आलेल्या मोर्चातील काही जणांनी केलेल्या दगडफेक प्रकरणात आतापर्यंत ४३ संशयितांसह वंचित बहुजन आघाडी,आदिवासी जनकल्याण पक्ष आणि इतर आदिवासी संघटनांच्या ५० ते ६० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३१ संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना रविवारी सटाणा न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
हेही वाचा >>> नाशिक : सिडकोत रस्ता काँक्रिटीकरणासाठी खोदकामामुळे गैरसोय; घरांचे ओटे तोडल्याने संताप
मणिपूरसह देशभरात आदिवासी, दलितांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात शनिवारी सटाण्यात मोर्चा काढण्यात आला होता. शांततेत निघालेल्या मोर्चाचा समारोप झाल्यानंतर एका टोळक्याने दोधेश्वर नाक्याजवळ ठिय्या दिला. पोलिसांनी त्यांची समजूत घालूनही ते ऐकेनात म्हणून सौम्य लाठीमार करण्यात आल्यावर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. जमावाने राज्य परिवहनच्या बससह खासगी वाहनांवर दगडफेक करून नुकसान केल्याने पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमध्ये सहायक उपनिरीक्षक यशवंत भोये, हवालदार रायसिंग जाधव, अजित देवरे, योगेश साळुंखे, विलास मोरे, अशोक चौरे, हरी शिंदे हे पोलीस कर्मचारी जखमी झाले.
हेही वाचा >>> शिर्डीत होतो, त्यामुळे कोल्हापुरात पाणी पातळी नियंत्रणात; दीपक केसरकर यांचा अजब दावा
पोलिसांनी अमोल बच्छाव, शेखर बच्छाव (रा.आंबेडकर नगर,सटाणा), म्हाळू पवार (मळगाव, तिळवण), नीलेश देवरे, दत्ता पवार (सटाणा), पोपट बोरसे (रातीर), सुनील माळी (वनोली), उमेश पवार (जायखेडा), राम गायकवाड (अंतापूर), वंजू अहिरे (बाभूळणे), लालमन सूर्यवंशी, देविदास सूर्यवंशी (धनाळेपाडा), रवींद्र गायकवाड (आलियाबाद) आदींसह ४३ जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडी,आदिवासी जनकल्याण पक्ष आणि इतर आदिवासी संघटनेच्या अनोळखी ५० ते ६० जणांविरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी काढण्यात आलेल्या मोर्चा समारोपानंतरर एका स्वयंघोषित नेत्याची तहसीलदार निवासस्थानाजवळ दगडफेक करणाऱ्या टोळक्याशी चर्चा झाली. त्यानंतर या टोळक्याने चौकात ठिय्या दिला. नंतरच पोलिसांवर दगडफेक, वाहनांच्या दिशेने दगडफेक केली. हा चिथावणी देणारा नेता कोण, याचा शोध सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.