उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढत असल्याने शीतपेयांसह इतर खाद्यपदार्थांचा मोह नागरिकांना अनावर होतो. बऱ्याच शीतपेयांमध्ये आरोग्यास अपायकारक अशा घटकांचा उपयोग करण्यात येत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने शीतपेयांची तपासणी करण्यात येत आहे. या अंतर्गत झालेल्या कारवाईत ३२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सध्या तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने शीतपेय, फळे, आइस्क्रिम, गोठविलेले पदार्थ तसेच उत्तेजक पेयांचा वापरही वाढला आहे. बाजारात या वस्तुंची विक्री वाढली आहे. या पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत पेठरोड येथील श्री शारदा फ्रुटस कंपनी येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आंब्यांचे नमुने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी घेतले. ओझर येथील व्ही.ए.एन.सी. एजन्सी येथून शीतपेयाच्या बटल्या ताब्यात घेत १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा >>>जळगाव: सावद्यात रविवारी पहिली राज्यस्तरीय केळी परिषद

मालेगाव येथील व्यंकटेश डिस्ट्रीब्युटर्स येथे गोठविलेल्या पदार्थांचे नमुने घेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. दिंडोरी येथील जऊळके परिसरातील आकाश एजन्सी येथूनही १३,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मालाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल. कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख, अमित रासकर, संदिप देवरे आदी सहभागी झाले. ही कारवाई संपूर्ण उन्हाळ्यात सुरू राहील, असे सहआयुक्त सं. भा. नारागुडे यांनी सांगितले.

Story img Loader