बनावट कागदपत्रांच्या आधारे शेती विकासासाठी कर्ज घेऊन कॉर्पोरेशन बँकेला तब्बल ३३ लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दिंडोरी येथील मूळ कर्जदारासह दोन व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील तीन वर्षांत फसवणुकीच्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. फसवणुकीच्या घटनांची झळ बँकांनाही बसत आहे. वाहन खरेदी न करता एका सहकारी बँकेची फसवणूक करण्याचा प्रकार नुकताच घडला होता. तसाच काहीसा प्रकार कॉर्पोरेशन बँकेबाबत घडला. या संदर्भात बँकेच्या आरती रौनियार यांनी तक्रार दिली आहे. हौसाबाई बोंबले आणि प्रमोद बोंबले यांनी २०१४ मध्ये कॉर्पोरेशन बॅँकेच्या कॉलेज रोडवरील मुख्य शाखेत स्वत:ची शेतजमीन विकसित करण्यासाठी कर्जाची मागणी केली होती. त्यात १४ एकर क्षेत्रावर द्राक्ष बाग उभारणीसह निवास बांधकामाचा समावेश होता.   दोन व्यावसायिकांच्या निविदेसह प्रकल्प अहवाल बँकेला सादर करण्यात आले होते. ही सर्व कागदपत्रे पाहून बँकेने २३ मार्च २०१४ ते ५ मार्च २०१५ या काळात कर्ज मंजूर करून ३३ लाख ५० हजारांची रक्कम धनाकर्षांद्वारे ज्ञानेश्वरी मोटर्स आणि सोमवंशी स्टील अ‍ॅण्ड सिमेंट या व्यावसायिकांना दिली होती. दरम्यानच्या काळात कर्जदाराकडून वेळेवर परतफेड न झाल्याने बँकेने चौकशी केली असता संबंधित कर्जदाराने दोन्ही व्यावसायिकांशी संगनमत करीत या रकमेचा नमूद कामासाठी वापर केला नसल्याचे निदर्शनास आले.  ३३ लाख ५० हजाराची रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरून बँकेची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी हौशाबाई बोंबले, प्रमोद बोंबले (टिटवे, दिंडोरी), ज्ञानेश्वर मोटर्स आणि सोमवंशी स्टील अ‍ॅण्ड सिमेंट यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.