नाशिक: जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसागणिक वाढत असून ऐन हिवाळ्यात सात तालुक्यांतील ३८० गाव-वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. जिल्ह्यातील २१ गावांची तहान भागविण्यासाठी तसेच टँकर भरण्यासाठी ४७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उन्हाळ्यात दुष्काळ, टंचाईची तीव्रता अधिक वाढण्याच्या मार्गावर आहे.

कमी पर्जंन्यमानामुळे यंदा पावसाळ्यात काही गावांना टँकरने पाणी देण्याची वेळ आली होती. आता पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गाव, वाड्यांची संख्या वाढत आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अहवालानुसार सध्या १३१ गावे आणि २४९ वाड्यांना ११६ टँकरने पाणी दिले जात आहे.

हेही वाचा… घरकुलांसाठी एल्गार कष्टकरी संघटनेचा ठिय्या; प्रकल्प अधिकाऱ्यांचे आश्वासन

नांदगाव, येवला तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता सर्वाधिक आहे. येवला तालुक्यात ४५ गावे आणि १५ वाड्या अशा एकूण ६० ठिकाणी २३ टँकर तर, नांदगावमध्ये ३७ गावे व १६२ वाड्यांना ३५ टँकरने पाणी पुरविले जात आहे. या तालुक्यातील १४ गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. बागलाण तालुक्यात १७ गावे व पाच वाडी (१५ टँकर), चांदवड तालुक्यात नऊ गावे १९ वाड्या (११), देवळा तालुक्यात सहा गावे व २९ वाड्यांसाठी (आठ टँकर), मालेगाव तालुक्यात १४ गावे व १३ वाड्या (१५ टँकर), सिन्नर तालुक्यात तीन गावे व सहा वाड्यांसाठी (नऊ टँकर) पाणी पुरवठा होत आहे. जिल्ह्यात सध्या ११६ टँकर कार्यरत असून त्यांच्या २५६ फेऱ्यांना मान्यता दिली गेली आहे.

विहिरींचे अधिग्रहण

बागलाण तालुक्यात १०, मालेगाव १८, नांदगाव १४, चांदवड आणि येवला तालुक्यात प्रत्येकी एक अशा एकूण ४७ विहिरींचे प्रशासनाने अधिग्रहण केले आहे. यातील २१ विहिरी गावांसाठी तर २६ विहिरी टँकरसाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

दिंडोरी, इगतपुरी, कळवण, नाशिक, निफाड, पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर या आठ तालुक्यात अद्याप टँकरची गरज भासलेली नाही. पुढील काळात या भागातील टंचाईग्रस्त गावांमधून टँकरची मागणी होण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader