धुळे – शहरातील प्रमोद नगरात वास्तव्यास असलेल्या एकाच कुटूंबातील चौघे जण गुरुवारी मृतावस्थेत आढळून आले. कुटूंबातील प्रमुख व्यक्ती प्रवीण गिरासे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर, पत्नी आणि दोन मुलांनी विषारी द्रव घेतलेले दिसले. प्रवीण गिरासे (५२), पत्नी दीपांजली गिरासे (४७), मुलगे सोहम गिरासे (१८) आणि गितेश गिरासे (१४) अशी मृतांची नावे आहेत. धुळ्याच्या देवपूर भागातील प्रमोद नगरात सेक्टर क्रमांक दोनमध्ये प्रवीण गिरासे यांचे कुटूंबियांसह वास्तव्य होते. पारोळा रस्त्यावरील मुंदडा मार्केटमधील व्यापारी संकुलात गिरासे यांचे कामधेनू ॲग्रो या नावाचे दुकान आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नाशिक : मालमोटारीच्या धडकेने युवकाचा मृत्यू

प्रवीण यांचे दोन दिवसांपूर्वीच त्यांची बहीण संगीता राजपूत यांच्याशी बोलणे झाले होते. प्रवीण हे मुलाच्या शैक्षणिक कामानिमित्त पुणे येथे जाणार होते. यामुळे संगीता यांचा दोन दिवसांपासून प्रवीण यांच्याशी संपर्क नव्हता. त्यानंतर संगीता यांनी प्रवीण यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता उत्तर न मिळाल्याने संगीत यांनी गिरासे कुटूंबातील इतर सदस्यांशी संपर्क केला. परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने संगीता राजपूत गुरुवारी सकाळी प्रवीण गिरासे यांच्या घरी गेल्या. घराचे दार केवळ लोटलेले होते. आतमधून कडी लावलेली नसल्याने त्या आत शिरल्या असता प्रचंड दुर्गंधी जाणवली. आतील खोलीत प्रवीण यांनी गळफास घेतल्याचे आणि पत्नी, दोन्ही मुलगे जमिनीवर मृतावस्थेत दिसल्याने संगीता यांना धक्का बसला. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून माहिती दिल्यानंतर रहिवाशांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यास या घटनेची माहिती दिली. पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ही सामूहिक आत्महत्या की घातपात, याविषयी पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 members of a family found dead under suspicious circumstances in dhule zws