विद्युत विभागाच्या प्रभारी अभियंत्याचा पदभार काढला; जीर्ण वीज खांबांच्या सर्वेक्षणात सावळागोंधळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : आढावनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून ४० लाखाचे दिवे लंपास होण्याच्या प्रकारात महापालिकेच्या विद्युत विभागाची कार्यपध्दती संशयास्पद असल्याचा आरोप करत सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान विद्युत विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता देवेंद्र वनमाळी यांच्याकडील पदभार काढून घेण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रकाराची चौकशी करून पुढील सभेत अहवाल ठेवावा. त्यावरून दोषींवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.

क्रीडा संकुलात दिवे बसविले की नाही, याबद्दल स्थानिक नगरसेवक प्रशांत दिवे यांनी शंका उपस्थित केली. एलईडी दिव्यांसाठी शहरातील जीर्ण वीज खांब बदलण्याच्या विषयावरील चर्चेत विद्युत विभागाच्या कारभाराचे नमुने सदस्यांनी अनुभवले. मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरात एलईडी दिवे बसविणे, जीर्ण खांब बदलणे आणि क्रीडा संकुलातून लंपास झालेले दिवे यावर वादळी चर्चा झाली. जीर्ण खांब बदलण्यासाठी १० कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावावरील चर्चेत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या.

शहरात ८२ हजार खांब असून त्यातील बहुतांश खांबांची तपासणी झाली आहे. जीर्ण खांबांवर एलईडी दिवे बसविण्यासाठी ते बदलले जाणार आहेत. यातील त्रुटींवर सुधाकर बडगुजर, गुरूमित बग्गा आदींनी बोट ठेवले. आतापर्यंत जिथे एलईडी दिवे बसविले गेले, तिथे पुरेसा प्रकाश पडत नसल्याच्या तक्रारी आहेत. प्रभागात किती खांब जीर्ण आहेत, सर्वेक्षण कधी झाले, कोणी केले, स्थानिक नगरसेवकांना याबद्दल विचारणा देखील झाली नसल्याचे सांगत सदस्यांनी प्रशासनाने ठेकेदारामार्फत हे बनावट सर्वेक्षण केल्याचा आरोप केला.

जीर्ण खांबांविषयीच्या सर्वेक्षण अहवालाची मागणी करण्यात आली. आपल्या प्रभागात किती जीर्ण खांब आहेत, याबद्दल बग्गा यांनी विचारणा केल्यावर विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांकडे माहिती उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. धावपळ करत ती फाईल मागविली गेली. माहिती देतांना जो परिसर त्यांच्या प्रभागात नाही, तेथील जीर्ण खांबांची माहिती देण्यात आली. यावरून वातावरण तापले असताना प्रभाग क्रमांक १७ मधील आढावनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ४० लाखाचे दिवे गायब झाल्याच्या विषयाकडे नगरसेवक प्रशांत दिवे यांनी लक्ष वेधले.

मध्यंतरी क्रीडा संकुलात भेट दिली असता तिथे अंधार पसरलेला होता. याबद्दल विचारणा केली असता विद्युत विभागाचे जानमाळी यांनी ते चोरीला गेल्याची शक्यता वर्तवली. मुळात इतक्या उंचीवर बसविलेले दिवे सहजासहजी कोणाला काढता येणार नाही. दिवे बसविल्याच्या खुणा तिथे असायला हव्यात. या प्रकारात  गौडबंगाल असण्याची साशंकता आहे. दिवे न बसविता परस्पर देयके लाटण्याचा हा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला गेला. या प्रकारास जबाबदार असणाऱ्या विद्युत विभागाचे अभियंता जानमाळी यांना निलंबित करण्याची मागणी दिवे यांनी केली.  सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महापौरांनी जानमाळी यांच्याकडील विद्युत विभागाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्याचे निर्देश दिले. तसेच या प्रकाराची चौकशी केली जाईल. त्याचा अहवाल पुढील सभेत ठेवण्याचे निर्देश दिले. अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 lakh lights disappear from sports complex zws
Show comments