नाशिक : हजारो किलोमीटरची मजल दरमजल करीत शहर परिसरात आलेल्या शेकडो आजारी आणि कमालीच्या थकलेल्या उंटांपैकी दोन उंटांचा पांजरापोळ येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. याआधी प्रवासात एक उंट दगावला होता. पांजरापोळच्या परिसरात सध्या १०९ उंटांची सुश्रुषा केली जात असून त्यावर दैनंदिन सुमारे ४० हजार रुपयांचा खर्च होत आहे. या घटनाक्रमात जिल्ह्याच्या सीमेवर मालेगाव येथे नव्याने ४३ उंट दाखल झाल्यामुळे पोलीस, शासकीय आणि पशुवैद्यकीय यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहे. नव्याने आलेल्या उंटांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मालेगाव परिसरातील पांजरापोळमध्ये ठेवता येईल का, याची चाचपणी सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साधारणत: दोन आठवड्यांपासून सटाणा, दिंडोरी आणि कळवण भागातून उंटांचे कळप मार्गस्थ होत आहेत. यात वयोवृध्द, आजारांनी ग्रस्त आणि अविरत चालून थकलेल्या उंटांचा समावेश आहे. तस्करीसाठी त्यांना कुठेतरी नेले जात असल्याचा संशय बळावला आहे. केंद्रीय प्राणी मंडळाकडे २०० उंटांविषयी तक्रार झालेली आहे. शहर परिसरात दाखल झालेल्या १११ उंटांना प्रशासनाने ताब्यात घेऊन पांजरापोळच्या स्वाधीन केले. पशू वैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांनी सर्व उंटांची वैद्यकीय तपासणी केली. यातील १० ते १५ उंटांची प्रकृती गंभीर होती. त्यांना आवश्यक ते औषधोपचार सुरू करण्यात आले. याच दरम्यान दोन उंटांचा मृत्यू झाल्याचे पांजरापोळचे व्यवस्थापक विठ्ठल आगळे यांनी सांगितले.

पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली थोरात यांनी मृत्यू झालेल्या उंटांचे विच्छेदन केले. त्यात हे उंट काही जुनाट आजारांनी ग्रस्त असण्याची शक्यता व्यक्त झाली. अनेक दिवसांपासून ते चालत होते. त्यांना पुरेसे अन्न, पाणी मिळाले नाही. बहुतांश उंटांच्या खुरांना जखमा झालेल्या आहेत. थकलेल्या उंटांची पांजरापोळमध्ये व्यवस्था झाली असली तरी बळावलेले आजार लगेच नियंत्रणात येण्याची शाश्वती नाही. मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी दगावलेल्या उंटांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार असल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले. पांजरापोळमध्ये आता १०९ उंट असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वी प्रवासात एक उंट दगावला होता. त्याच्या मालकाने शवविच्छेदनास नकार दिल्याने त्याचे शवविच्छेदन झाले नव्हते.

शहर परिसरात आलेल्या उंटांना त्यांच्या मूळ प्रदेशात माघारी कसे पाठवायचे, यावर खलबते सुरू असताना जिल्ह्याच्या सीमेवर नव्याने ४३ उंट दाखल झाल्यामुळे पोलीस, जिल्हा प्रशासन व पशुवैद्यकीय विभागाला पुन्हा काम लागले. पोलिसांनी मालेगाव परिसरात या उंटांना थांबविले. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मालेगाव परिसरातील पांजरापोळमध्ये उंटांची व्यवस्था करता येईल का, यादृष्टीने प्रयत्न सुरू केले जात असल्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सांगितले.

यापूर्वी पकडलेल्या उंटांना कुठे नेले जात होते, याचा तपास सुरू आहे. उंटांची छळवणूक केल्या प्रकरणी सात उंट मालकांवर दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उंटांची संख्या वाढत असल्याने पशुधन अधिकाऱ्यांना दैनंदिन कामे सांभाळून त्यांच्या औषधोपचाराकडे लक्ष द्यावे लागत आहे. वाळवंटी प्रदेशातील उंट हा महाराष्ट्रातील प्राणी नाही. त्यामुळे त्याचे आजार, त्यावरील उपचार व तत्सम बाबींची माहिती स्थानिक पशुधन अधिकारी राजस्थानातील पशुधन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मिळवत आहेत. या उंटांना त्यांच्या मूळ प्रदेशात पाठविणे योग्य असल्याचे पशूधन विकास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भटकंती करणारा प्राणी एकाच ठिकाणी ठेवणे योग्य नाही. लवकरच पावसाचा हंगाम सुरू होत आहे. ते वातावरण त्याला मानवणारे नसल्याचे या अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते.

दैनंदिन ३५ ते ४० हजारांचा आर्थिक भार

प्रशासनाने सुरूवातीला पांजरापोळकडे स्वाधीन केलेल्या १०९ उंटांवरील उपचार व त्यांच्या खाण्या पिण्यासाठी दैनंदिन ३५ ते ४० हजार रुपयांचा खर्च लागत असल्याचे पांजरापोळकडून सांगण्यात आले. त्यांना ऊस, गुळ, शेंगदाणे व हरभरा असा आहार दिला जात आहे. त्यांच्यावर औषधोपचार केले जात असून काहींना सलाईन लावण्यात आली आहे. सर्व उंटांना एक इंजेक्शनही द्यावे लागणार आहे. सुमारे २०० ते ३०० रुपये प्रति इंजेक्शन त्याची किंमत असल्याचे सांगितले जाते. उंटांच्या सुश्रुषेपोटी लागणारा खर्च पांजरापोळला द्यावा, असे पशुवैद्यकीय विभागाने सुचविले आहे. उंटांच्या रक्त व अन्य चाचण्या शासकीय प्रयोगशाळेमार्फत करण्यात आल्या. पशू वैद्यकीय सर्व चिकित्सालयात उपलब्ध औषधेही मोफत स्वरुपात दिली जात असल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. वैशाली थोरात यांनी सांगितले.

जिल्ह्यात इतक्या मोठ्या संख्येने उंट कुठून आले, कुठे जात होते, याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. धुळ्याहून नगरकडे जाण्यासाठी नव्याने ४३ उंट मालेगावजवळ दाखल झाले. पोलीस चौकशीत मालक उंट पालन हा आपला परंपरागत व्यवसाय असल्याचे सांगत आहेत. उंटांची चारा-पाण्याची व्यवस्था करून त्यांना राजस्थानमध्ये परत पाठवायचे असल्यास प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे. पोलीस तपासात उंटांबाबत सर्व गोष्टी पुढे येतील.

– दादा भुसे (पालकमंत्री, नाशिक)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 43 new camels entered nashik border two camels died in panjrapol ysh
Show comments