मालेगाव : अचानक वाढलेल्या पूर पाण्यामुळे येथील गिरणा नदी पात्रात हौस म्हणून मासेमारीसाठी गेलेले १५ जण अडकून पडले आहेत. या सर्वांना वाचविण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. रात्री उशिरा धुळे येथून आलेल्या बचाव पथकातर्फे मदतकार्य सुरु करण्यात आले. मात्र पाण्याचा मोठा प्रवाह तसेच रात्रीची वेळ यामुळे बचाव कार्यास मर्यादा आल्या

चणकापूर आणि पुनद धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या दोन्ही धरणांमधून पाण्याचा शनिवारी रात्रीपासून विसर्ग सुरू आहे. रविवारी दुपारनंतर या दोन्ही धरणांमधील पाण्याच्या वाढलेल्या आवकेमुळे ठेंगोडा बंधाऱ्यावरुन जवळपास २० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सुरु आहे. त्यामुळे गिरणा नदीस पूर आला. पावसाचा जोर टिकून राहिल्यास विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनातर्फे सतर्क करण्यात आले होते. असे असताना धुळे व मालेगावमधील काही उत्साही लोक शहराजवळील संवदगावलगत गिरणा नदीपात्रातील मासेमारीसाठी गेले होते.

हेही वाचा >>>नाशिक जिल्ह्यातील अपघातात दोन जणांचा होरपळून मृत्यू

नदीपात्रातील एका टेकडीवर उभे राहून हे लोक मासेमारी करत असताना सायंकाळी अचानक पुराचे पाणी वाढले. त्यामुळे ही टेकडी पुराच्या पाण्याने वेढली गेल्याने ते तेथे अडकून पडले. मालेगाव महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख डॉ. संजय पवार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. परंतु, पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे नदीपात्रातील या टेकडीपर्यंत मदतकार्य पोहोचविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना मर्यादा आल्या. रात्र झाल्याने मदतकार्यातील अडचणींमध्ये वाढ झाली. त्यामुळे धुळे येथून खास बचाव पथकास पाचारण करण्यात आले. टेकडीवर जवळपास १५ जण अडकल्याचा अंदाज आहे. हे लोक धुळे व मालेगावमधील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. पूर पाण्याच्या पातळीपासून ही टेकडी जवळपास १० फूट उंच असल्याने अडकलेले लोक धोक्याबाहेर असल्याचेही दिसत आहे.