नाशिक : देवळा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून सेवानिवृत्त शिक्षिकेच्या पिशवीतून ५० हजार रुपये चोरण्यात आले. विशेष म्हणजे, पंधरा दिवसांपूर्वीच बाजार समितीच्या आवारात उभ्या मोटारीतून पैसे लंपास करण्यात आल्याची घटना ताजी असतांनाच गुरुवारी बँकेतून महिलेच्या पिशवीतून पैसे चोरीस गेल्याने ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा ठाकला आहे. पोलिसांनी चोरांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
देवळा तालुक्यातील गुंजाळनगर येथील सेवानिवृत्त शिक्षिका जयश्री गुंजाळ (७५) या गुरूवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास देवळा येथे बँक शाखेत पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी बँकेतून ५५ हजार रुपये काढून कापडी पिशवीत ठेवले. यानंतर त्या खात्यावर किती रक्कम शिल्लक आहे, हे पाहण्यासाठी बँकेलगतच असलेल्या एटीएममध्ये पास बुकवर नोंदी करण्यासाठी गेल्या. यंत्रात पासबुकावर नोंदी करणे त्यांना जमत नसल्याने तेथे असलेल्या त्यांच्या गावातील मुलाला त्यांनी नोंदी करण्यास सांगितले.
गुंजाळ कापडी पिशवी खांद्याला अडकवून तेथेच थांबल्या होत्या.पासबुकात नोंदी करुन त्या घरी गेल्यावर पिशवी बघितली असता पिशवीत फक्त पाच हजार रुपये आढळून आले. त्यांनी बँकेत जावून चौकशी केली. परंतु, पैसे मिळून आले नाहीत. गुंजाळ यांनी देवळा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कसून चौकशी करावी, अशी मागणी सेवानिवृत्त शिक्षिका गुंजाळ यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गुंजाळ यांनी केली आहे. बँकेने एटीएम मध्ये सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.