यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने परीक्षा विभागात उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यासाठी खास यंत्रणा कार्यान्वित केली असून या मार्फत तब्बल ५० लाख उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर, स्कॅनिंग झालेल्या या उत्तरपत्रिका ऑनलाइन पद्धतीने तपासल्या जातील. त्यासाठी राज्यातील शेकडो शिक्षकांना तपासणीसाठी विद्यापीठात येण्याची गरज नाही. डिजिटल स्कॅनिंग मुळे कमी वेळात अधिक काम होऊन कामकाजात सुसूत्रता येणार असल्याची विद्यापीठाची अपेक्षा आहे.

येथील मुक्त विद्यापीठात डिजिटल उत्तर पत्रिका स्कॅनिंग केंद्राचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते झाले. या वेळी उपरोक्त प्रक्रियेची माहिती देण्यात आली. सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. शैक्षणिक क्षेत्रात होत असलेले निरनिराळे बदल लक्षात घेणे आवश्यक आहे. मूल्यांची जोपासना करत त्यावर आधारित असलेले शिक्षण आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून समाजात परिवर्तन घडवून आणणे हे शिक्षण पद्धतीचे अंतिम ध्येय असून पुढील काळात विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून त्याचा वापर शैक्षणिक विकासासाठी करायला हवा ही या दशकाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञान क्रांतीच्या एकविसाव्या शतकात मूल्यावर आधारित नवीन शिक्षण पद्धतीचा विचार करायला हवा. या युगात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्व समाजाला शिक्षित करता येईल. त्यातून समाजपरिवर्तन घडून येईल. ज्ञान व विकास एकमेकांना पूरक असल्याने शैक्षणिक विकासाला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात उत्तर पत्रिकांचे स्कॅनिंग करण्यासाठी सद्य:स्थितीत ३४ डिजिटल स्कॅनिंग युनिट बसविण्यात आली आहेत. मे महिन्यात होणाऱ्या परीक्षांवेळी ही संख्या १२८ पर्यंत वाढविली जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यात एक लाख १४ हजार आणि डिसेंबरमधील एक लाख ७३ हजार उत्तर पत्रिकांचे डिजिटल स्कॅनिंग सुरू असून आतापर्यंत ७२ हजार उत्तर पत्रिकांचे स्कॅनिंग झाले आहे. ऑनलाइन पद्धतीने ३० हजार उत्तरपत्रिका तपासूनही झाल्या आहेत. यापूर्वी उत्तरपत्रिका तपासणीसाठी राज्यातील शेकडो शिक्षकांना थेट नाशिकच्या मुख्यालयात यावे लागत असे.

Story img Loader