लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धुळे : सत्ता मिळाल्यानंतर गरीब महिलांच्या बँक खात्यात दरवर्षी एक लाख रुपये जमा, सरकारी नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण, प्रत्येक संस्थांमध्ये दुप्पट भागिदारी, अशा महिला कल्याणविषयक अनेक घोषणा काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी येथे आयोजित महिला हक्क परिषदेत जाहीर केल्या.

गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी नंदुरबारहून निघाल्यावर धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे मुक्कामी होती. बुधवारी दुपारी धुळे येथील परिषदेत गांधी यांनी महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन दिली. काँग्रेस सत्तेवर आल्यावर कुठल्याही सर्वेक्षणाविना महिलांना आरक्षण दिले जाईल. गरीब कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यात वार्षिक एक लाख रुपये जमा करण्यात येतील.

आणखी वाचा-नाशिक : एटीएम फोडूनही रक्कम चोरण्यात अपयशी

केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये ५० टक्के पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतील. आशा, अंगणवाडी आणि माध्यान्ह भोजन बनवणाऱ्या महिलांच्या मासिक वेतनात केंद्र सरकारचे योगदान दुप्पट केले जाईल. प्रत्येक ग्रामपंचायतीत महिलांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांची माहिती देण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. देशातील नोकरदार महिलांसाठी वसतिगृहांची संख्या दुप्पट करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वसतिगृह राहील, अशा घोषणा गांधी यांनी केल्या.

आणखी वाचा-नाशिक, दिंडोरीत ५०० पेक्षा अधिक उमेदवार, सकल मराठा समाजाची तयारी

तत्पूर्वी गांधी यांचा शहरात रोड शो झाला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ चौकसभेत त्यांनी काँग्रेसला पाठबळ देण्याचे आवाहन केले. पहिल्या यात्रेत आपणास भेटलेले शेतकरी, युवक, महिलांनी देशभरात पसरलेल्या हिंसेचे कारण केवळ अन्याय असल्याचे सांगितल्याने दुसऱ्या यात्रेत न्याय शब्द जोडल्याचे गांधी यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून शेतकरी, मजूर, महिला, युवक, छोटे व्यापारी यांच्यावर आर्थिक आणि सामाजिक अन्याय केला जात आहे. गॅस सिलिंडरचे दर ४०० रुपये असतांना नरेंद्र मोदी यांनी महागाई वाढल्याची ओरड केली होती. आता ११०० रुपये दर झाला असताना माध्यमेही त्याविषयी गप्प आहेत. देशातील समस्यांऐवजी २४ तास मोदी यांचाच चेहरा दाखवला जात आहे. आपण जीएसटीच्या माध्यमातून पैसा भरतो आणि दुर्दैवाने थेट अदानीला कर्जमाफी स्वरूपात ते दिले जातात, अशी टीका गांधी यांनी केली.

यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, अश्विनी पाटील, प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 50 percent reservation in government jobs rs 1 lakh per year for poor women says rahul gandhi mrj