लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: २००० रुपयांच्या नोटा वितरण प्रणालीतून काढून टाकण्यात येणार असल्याने त्याच प्रमाणात आता ५०० रुपयांच्या नोटा युध्दपातळीवर उपलब्ध करण्याची तयारी सुरू झाली आहे. नाशिक रोडच्या चलार्थपत्र मुद्रणालयाला पुढील चार महिन्यांत ५०० रुपयांच्या २८० दशलक्ष नोटा छापून देण्याची सूचना करण्यात आली आहे. म्हणजे वर्षभरात ज्या नोटा मुद्रणालयाने छपाई करण्याचे लक्ष्य होते, त्यांची लवकर पूर्तता करावी लागणार आहे. त्यानंतर मुद्रणालयाकडे पुन्हा मागणी नोंदविली जाणार आहे.
निश्चलनीकरणानंतर दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारात आल्या होत्या. या नोटांची छपाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुद्रणालयांमध्ये झाली होती. बंद होणाऱ्या २००० रुपयांच्या नोटा २३ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत बदलून घेता येणार आहे. आरबीआयने दोन हजार रुपयांच्या जेवढ्या नोटा वितरणात आणल्या, त्याच्या चारपट अधिक बदलताना ५०० रुपयांच्या नोटा लागतील. ही बाब लक्षात घेऊन भारत प्रतिभृती मुद्रणालय महामंडळाच्या अखत्यारीतील मुद्रणालयांकडे वर्षभरासाठी ५०० रुपयांच्या नोटांसंदर्भात नोंदविलल्या मागणीची लवकर पूर्तता करण्यास सांगण्यात आले आहे. या बाबतची माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिली.
आणखी वाचा-नाशिक : छकुल्यानंतर घोड्या स्थानबद्ध; सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांची कारवाई
आरबीआयने २००० हजारच्या नोटा बंद करण्याचा घेतलेला निर्णय चलार्थपत्र मुद्रणालयास लाभदायक ठरला आहे. नाशिकरोड मुद्रणालयाला या वर्षात पाच हजार २०० दशलक्ष नोटा छपाईचे काम मिळाले आहे. या मुद्रणालयात दहा ते ५०० रुपयांपर्यंतच्या नोटांची छपाई होते. २००० रुपयांची नोट बदलताना मुख्यत्वे ५०० रुपयांच्या नोटा उपलब्ध केल्या जातील. त्यामुळे ५०० रुपयांच्या नोटांचे वार्षिक लक्ष्य चार महिन्यात पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. ५०० रुपयांच्या नोटेसह इतरही नोटांना मागणी येणार आहे. २००० रुपयांची नोट बंद झाल्यामुळे मुद्रणालयास नोटा छपाईचे जादा काम मिळणार आहे.