ऑगस्टमध्ये सर्वाधिक १२ आत्महत्या  ल्ल ३३ प्रकरणांत शासकीय मदत, १३ प्रकरणे नामंजूर
दुष्काळाचे सावट गडद झाले असताना नैसर्गिक संकट आणि कर्जाचा वाढता बोजा या चक्रव्युहात सापडलेल्या जिल्ह्य़ातील ५१ शेतकऱ्यांनी मागील नऊ महिन्यात आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. त्यातील ३३ प्रकरणात संबंधितांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मंजूर झाली तर १३ प्रकरणे निकषात न बसल्याने नामंजूर झाली. उर्वरित पाच प्रकरणे प्रलंबित आहेत. या वर्षी सर्वाधिक म्हणजे १२ आत्महत्या केवळ ऑगस्ट महिन्यात झाल्या आहेत.
दीड वर्षांपासून जिल्ह्यास नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत आहे. गारपीट, अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. सातत्याने संकटे कोसळत असताना आता दुष्काळाचे सावट दाटले आहे. अनेक तालुक्यांत पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. खरीपाची पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. उत्पादन हाती येत नसल्याने शेतीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करणे अनेकांसाठी मोठे संकट आहे. कर्जाचा डोंगर वाढत असल्याने वैतागलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत असल्याचे दिसते. मागील नऊ महिन्यांचा आढावा घेतल्यास आतापर्यंत एकूण ५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.  विषप्राशन, गळफास, पाण्यात उडी मारून आणि रेल्वेखाली उडी घेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. जुलै महिन्यात नऊ जणांनी आत्महत्या केली होती. जानेवारीत दोन, फेब्रुवारी सात, मार्च चार, एप्रिल तीन, मे तीन तर, जूनमध्ये चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक म्हणजे १२ शेतकऱ्यांनी जीवन संपवले.
नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रकरणात शासनाकडून मयतांच्या कुटुंबियास एक लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जाते. सकृतदर्शनी आत्महत्येचे कारण शासन निकषात बसत असल्यास अशी प्रकरणे ४८ तासात जिल्हास्तरीय समितीसमोर ठेऊन अनुदान मंजूर करण्याची कार्यवाही तातडीने करणे अपेक्षित आहे. या वर्षांत एकूण ४६ प्रकरणे जिल्हास्तरीय समितीसमोर ठेवण्यात आली. त्यातील ३३ प्रकरणे मंजूर झाली असून १३नामंजूर झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पाच प्रकरणे प्रलंबित आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत १० प्रकरणे मंजूर केली गेली तर दोन प्रकरणे तालुका समितीचा अहवाल प्राप्त नसल्याने प्रलंबित ठेवण्यात आली.
ऑगस्ट महिन्यात जीवनयात्रा संपविणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मन्याराम गुंजाळ, रंगनाथ म्हस्के, वासुदेव देशमुख (सर्व मालेगाव), भाऊसाहेब साबळे, बाबाजी कोर, चेतन सोनवणे (सर्व बागलाण), रामभाऊ शेळके, दीपक साळवे, बबन पडोळ (सर्व निफाड), संजय वाघ (नांदगाव), प्रभाकर सेंद्रे (सिन्नर) आणि संदीप भगत (येवला) यांचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात संदी गाडे (निफाड), नारायण चव्हाण (मालेगाव) आणि सिताराम जगताप (कळवण) यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे.
जिल्हास्तरीय समिती शासकीय मदत देताना तहसीलदार, पोलीस व कृषी विभागाच्या तालुकास्तरीय समितीचा संयुक्त अहवालाचा प्राधान्याने विचार करते. जी प्रकरणे नामंजूर झाली त्यात प्रामुख्याने दारुचे व्यसन, नशेत असताना वाहन चालविताना अपघात, मानसिक संतुलन खराब, मयत व्यक्तीच्या नावे नव्हे तर सासऱ्याच्या नावे कर्ज, अशी काही कारणे असल्याचे दिसून येते. या कारणावरून जिल्हा समितीने उपरोक्त प्रकरणे नामंजूर केली आहेत.

Story img Loader