नाशिक – शहरात एक एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत सुमारे ५३१ आगीच्या घटना घडल्या. यात ३१ मोठ्या, ४९ मध्यम तर ४५१ लहान स्वरुपाच्या होत्या. आगीच्या दुर्घटनांमध्ये् १० कोटी ६४ लाख ३६ हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. तर ३६ कोटीहून अधिकची मालमत्ता वाचविण्यात यश आल्याचे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने म्हटले आहे.

मनपाच्या अग्निशमन विभागाच्यातर्फे अग्निशमन सेवा सप्ताहांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, अग्निशमन विभागाने नुकत्याच संपलेल्या वर्षातील आग व अन्य घटनांची माहिती दिली आहे. आपत्कालीन स्थितीत अग्निशमन दलाचे जवान व पाण्याचे बंब केवळ शहरात नव्हे तर, ग्रामीण भागातही मदतीला धावतात. वर्षभरात आगीच्या घटनांमध्ये १० कोटीहून अधिक मालमत्ता भस्मसात झाली. या काळात पक्षी अडकणे, झाड पडून वाहने अडकणे अशा २६९ बचाव मोहिमा दलाने राबविल्या. वादळी वारा व पावसात शहरात झाडे व फांद्या पडण्याच्या अनेक घटना घडतात. अशा ४३९ घटनांमध्ये दलाचे पथक सक्रिय राहिले. पाण्यात बुडालेले वा तत्सम शोध मोहिमांमधून २५ मृतदेह बाहेर काढण्यात आले. हेलिकॉप्टर उड्डाण-अवतरण अशा १६ वेळा दलाच्या बंबांनी हेलिपॅडजवळ सेवा दिली. या वर्षात दलाने ३७ रंगीत तालीम (मॉक ड्रील) केल्या.

उत्तुंग इमारतींसाठी यंत्रणेची प्रतिक्षाच

शहरात आता ७० मीटरपेक्षा उत्तुंग इमारती दृष्टीपथास पडत आहेत. अशा इमारतीत आग प्रतिबंधक यंत्रणा बंधनकारक आहे. तसेच .या ठिकाणी धोक्याचा संदेश देणारी यंत्रणाही कार्यरत असते, असे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितले. उत्तुंग इमारतीत आगीपासून बचावासाठी ९० मीटर उंच शिडीची यंत्रणा खरेदीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. परदेशी बनावटीची यंत्रणा निर्मितीस दीड ते पावणेदोन वर्षाचा कालावधी लागतो. या एरिअल लँडर प्लॅटफॉर्मची दलास प्रतिक्षा आहे.

महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्यातर्फे अग्निशमंन सेवा सप्ताहांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. सहा केंद्रांमार्फत वेगवेगळ्या भागात रंगीत तालमीतून प्रात्यक्षिके सादर केली जात आहेत. रविवारी दुपारी साडेचार वाजता सहा केंद्रांची एकत्रित फेरी काढण्यात येईल. फाळके रोड, दूध बाजार, भद्रकाली, मेनरोड, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नलमार्गे ही फेरी निघणार आहे.