नाशिक – गणेशोत्सवात सावर्जनिक मंडळांना परवानगीसाठी शहर पोलीस आयुक्तालयात सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी योजनेतंर्गत आतापर्यंत ५३४ अर्ज प्राप्त झाले असून त्या सर्वांना परवानगी देण्यात आली आहे. अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव आला असून बाप्पाच्या आगमनाची सर्वाना प्रतिक्षा आहे. घरोघरी यासंदर्भात तयारीला सुरुवात झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांकडूनही बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. पोलिसांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करताना मंडळांना कसरत करावी लागत आहे.
हेही वाचा >>> नाशिक: हरसूल वन परिक्षेत्रातून खैर लाकूड तस्करीचा प्रयत्न, वाहनासह मुद्देमाल जप्त
शक्य होईल त्याप्रमाणे नियमांचे पालन करुन सार्वजनिक गणेशोत्सव दणक्यात साजरा व्हावा यासाठी मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. चौक परिसर, मोकळे मैदान, इमारतीखालील वाहनतळ, रस्ता चौफुली अशा मोक्याच्या ठिकाणी मंडप उभारणीच्या कामांनी वेग घेतला आहे. मंडळांमार्फत गणेशोत्सवातील १० दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याने त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे निधीची जमवाजमव केली जात आहे. परिसरातील नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे, महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन इच्छुकांनी गणेशोत्सवात सक्रिय असलेल्या मंडळांचा जनसंपर्क वाढविण्यासाठी मदत घेतली आहे.
हेही वाचा >>> जळगाव: एरंडोल तालुक्यात खासगी बस नाल्यात कोसळून दोन ठार; १२ प्रवासी जखमी
महिलांसाठी आरोग्य शिबीर, मुलांसाठी स्पर्धा, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत पंचवटी, सरकारवाडा, अंबड, नाशिकरोड अशा सर्व विभागातून परवानगीसाठी ५३४ अर्ज प्राप्त झाले असून त्या सर्वांना मान्यता देण्यात आली आहे. अंबडमधून सर्वाधिक १०२ परवानगी अर्ज प्राप्त झाले. सणाच्या उत्साहाला कार्यकर्त्यांच्या अतीउत्साहामुळे गालबोट लागून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी सार्वजनिक मंडळांसाठी नियमावली आखून दिली आहे. उत्सवासाठी आवश्यक परवानगी मिळविण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रासाठी पोलीस आयुक्तालयात एक खिडकी योजना कार्यान्वित केली आहे. मंडळांकडून या योजनेचा लाभ घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.