बँकेचे बनावट माहितीपत्रक सादर करून सात ग्राहकांनी आयडीएफसी फर्स्ट बँकेतून ५४ लाखांचे कर्ज घेऊन बँकेला गंडविल्याचा प्रकार उघड झाला आहे. महत्वाचे म्हणजे, यात बँकेच्या अधिकृत दलालाने कर्जदार ग्राहकांशी संगनमत केले, त्यांना बनावट माहितीपत्रक तयार दिले. ते बँकेत सादर करीत हे उद्योग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी आठ जणांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात बँकेची फसवणूक करून पैश्यांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – नाशिक: दाहिनीऐवजी सरणावरच अंत्यविधी,अंत्यसंस्कारात सव्वा कोटींचा खर्च
याबाबत बँकेचे अधिकारी प्रमोदकुमार अमेटा यांनी तक्रार दिली. आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या मायको चौकातील शाखेत मार्च ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. बँकेतील अधिकृत दलाल संशयित योगेश पाटीलने (आबाड रेसिडेन्सी, तळवाडे रोड, चांदवड) दोन मार्च २०२२ पासून गणेश सांगळे, सूर्यकांत वाघुळे, ताई पगारे, योगेश काकड, सुरेखा गायकवाड, नंदू काळे आणि स्वाती शिरसाठ या कर्जदार ग्राहकांशी संगनमत केल्याचे बँकेने तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा – मालेगाव: भूईकोट किल्ला अतिक्रमण विरोधातील आंदोलन स्थगित
पाटीलने संबंधितांच्या बँक खात्याचे बनावट माहितीपत्रक तयार केले. ते बँकेत सादर करून त्यांच्या नावे सहा ते नऊ लाखांपर्यंतची कर्ज प्रकरणे मंजूर करून घेतली. ही एकूण रक्कम ५४ लाख सहा हजार ८६२ रुपये इतकी आहे. फसवणूक करून बँकेच्या पैश्यांचा अपहार केला. जवळपास नऊ महिने हा प्रकार सुरू होता. पाटीलने ग्राहकांची कर्ज प्रकरणे बँकेतून मंजूर करून घेतली. कालांतराने हा प्रकार लक्षात आल्यावर अनेक कर्ज प्रकरणात ही कार्यपद्धती अवलंबली गेल्याचे निष्पन्न झाले.