नाशिक – बागलाण तालुक्यातील रातीर येथील जिल्हा परिषद शाळेतील सहावीची विद्यार्थिनी मानसी अहिरे हिचा कर्करोगाने मंगळवारी मृत्यू झाला. मृत्युपूर्वी तिने लिहिलेल्या पत्रात शाळा आणि शिक्षकांप्रति व्यक्त केलेल्या भावनेने सारेच गहिवरले आहेत. उपचारादरम्यान, शाळा बुडत असल्याची तिला खंत होती. शाळेची खूप आठवण येत असली तरी नाईलाज असल्याचे तिचे शेवटचे शब्द शिक्षणाची उर्मी दर्शवित होते. गेल्यावर्षी सहलीला जाण्याची तिची तीव्र इच्छा होती. परंतु, आजारपणामुळे ती अपूर्णच राहिली.
हेही वाचा >>> पंढरपूरमध्ये राज्यभरातील सायकलपटूंचा रिंगण सोहळा; नाशिक-पंढरपूर सायकलवारीत ३०० जणांचा सहभाग
शेतकरी राघो अहिरे यांची मुलगी मानसी माध्यमिक शिक्षण घेत होती. गेल्या दिवाळीनंतर तिच्या आशा- आकांक्षांना ग्रहण लागले. गळ्याला सूज येण्याचे निमित्त झाले. लक्षणात्मक प्राथमिक उपचार झाले. परंतु, त्यामुळे फरक न पडल्याने पालकांच्या काळजाचा ठोका चुकला. नाशिक गाठून मोठ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला गेला. मात्र, त्यामुळेही कोणताच फरक न पडल्याने मुंबई गाठण्यात आली. या ठिकाणी विविध तपासणीनंतर रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. सर्वांनाच धक्का बसला. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. त्यानुसार वडिलांनी मुलीला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले. गुरुवारी मानसीने या जगाचा निरोप घेतला, तत्पूर्वी तिने शिक्षकांना लिहिलेल्या पत्राने शिक्षकवृंदच नव्हे तर, ग्रामस्थही हेलावले.
मागील वर्षी शाळेतर्फे शैक्षणिक सहलीचे नियोजन होते. मात्र, ही सहल दिवाळीनंतर काढण्यात आली. तत्पूर्वीच मानसीची प्रकृती खालावली आणि तिची सहलीला जाण्याची इच्छा अपूर्ण राहिली. याबद्दल तिने पत्रात उल्लेख केला आहे. ‘सर, सहल दिवाळीपूर्वीच नेली असती तर, मीही आली असते, हे तिचे वाक्य शिक्षकवृंदाला चटका लावून गेले. शाळा आणि शिक्षकांप्रति तिने व्यक्त केलेल्या भावनेने सारेच गहिवरले. मानसीचे पत्र हदयस्पर्शी आहे. त्यात तिने शिक्षकांचे गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याप्रति आदरभाव व्यक्त केला आहे. मुलगी मृत्युच्या दारात असताना वडिलांनी तिचे कसे लाड पुरविले, हेदेखील तिने पत्रात नमूद केले आहे.
हेही वाचा >>> अमृतधाम परिसर विजेच्या लपंडावामुळे त्रस्त – रोजच्या त्रासामुळे नागरिकांमध्ये रोष
निदान झाले आणि… मानसीच्या गळ्याला सूूज आली तेव्हा वडिलांनी मालेगाव, नाशिकच्या डॉक्टरांचे उपचार घेतले. औषधे घेऊनही फरक पडत नव्हता. नंतर तिला मुंबईला नेण्यात आले. यासंबंधीचा संपूर्ण घटनाक्रम मानसीने पत्रात मांडला आहे. आम्ही तपासणीसाठी चार वेळा मुंबईला गेलो. शेवटचा स्कॅन केल्यानंतर रक्ताचा कर्करोग झाल्याचा अहवाल आला. ‘मग दुसऱ्या दिवशी मला पप्पांनी छान ड्रेस घेतला. बूट घेतले. घड्याळ घेतलं आणि आम्ही घरी आलो….’ असे तिने पत्रात नमूद केले आहे. आपले आजारपण मानसी स्वत:च्या डोळ्यांनी बघत होती, अनुभवत होती. हे सर्व अखेरच्या काळात तिने पत्रात मराठीतूनशब्दबद्ध केले. शाळा, शिक्षक, कुटुंबियांप्रतीचे ऋणानुबंध अधोरेखीत करीत त्यांना गमावत असल्याचे दु:ख तिने इंग्रजीत मांडले आहे.