मनमाड – हावडा-मुंबई मेल या गाडीने प्रवास करणार्या एका व्यक्तीकडे ६१ लाख ३९ हजार रुपये रोख आणि दागिने असा ऐवज मिळून आला. रक्कम आणि दागिन्याबाबत संबंधिताने कोणतीही माहिती न दिल्याने मनमाड रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने त्याला ताब्यात घेत कारवाई केली. पुढील तपासासाठी त्याला नाशिक प्राप्तीकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले. प्राप्तीकर विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
संबंधित व्यक्ती ६१ लाखाची रोकड घेऊन रेल्वे गाडीने असा प्रश्न उपस्थित होत आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित व्यक्तीचे नाव हरिश्चंंद्र वरखडे असे आहे. गाडी क्रमांक १२८१० हावडा-मुंबई मेल (नागपूर मार्गे) या गाडीत रेल्वे सुरक्षा दलाच्या गस्ती पथकाने जळगाव ते मनमाड दरम्यान एका व्यक्तीला संशयास्पद सामानासह पकडले. त्याची चौकशी केली असता त्याने काहीही माहिती दिली नाही. रोकड आणि सामानाबाबत समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे पथकाने मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात त्या व्यक्तीला आरपीएफ पोलीस ठाण्यात आणले. त्याची चौकशी केली. त्याने आपले नाव हरिश्चंंद्र वरखडे (६४, देऊळ अली, जिल्हा सातारा असल्याचे सांगितले. तो वरील गाडीने जळगाव ते मुंबई असा प्रवास करत होता. शिवाय पंचांसमक्ष त्याच्याकडील बॅग उघडली असता त्यामध्ये ६१ लाख ३९ हजार रुपये इतकी रोकड मिळून आली. सोनेही त्याच्या बॅगमध्ये होते. ताब्यातील रक्कम आणि दागिन्यांसह या व्यक्तीला प्राप्तीकर विभागाचे उपसंचालक सचिन पुसे यांच्या ताब्यात देण्यात आले. संबंधित व्यक्तीला घेऊन प्राप्तीकरचे अधिकारी नाशिककडे रवाना झाले. प्राप्तीकर विभाग या प्रकरणाचा पुढील तपास करणार आहे.