जळगाव – महानिर्मितीच्या भुसावळजवळील दीपनगर येथील वीज प्रकल्प ६६० मेगावॉट स्थापित क्षमतेच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित संच क्रमांक सहाचे बाष्पक प्रदीपन महानिर्मितीचे संचालक (प्रकल्प) अभय हरणे यांच्या हस्ते नियंत्रण कक्षातून कळ दाबून यशस्वीरीत्या करण्यात आले. महानिर्मितीचा हा ६६० मेगावॉट क्षमतेचा चौथा संच आहे. यावेळी मेसर्स भेल कंपनीचे महाव्यवस्थापक दिनेश जवादे, भुसावळ प्रकल्प आणि वीज केंद्राचे मुख्य अभियंते अनुक्रमे विवेक रोकडे, मोहन आव्हाड यांची उपस्थिती होती.
भुसावळ येथे महानिर्मितीचे ५०० मेगावॉट क्षमतेचे दोन संच आणि २१०मेगावॉट क्षमतेचा एक संच यांमधून नियमित वीजनिर्मिती सुरू असून, त्यात आगामी काही दिवसांत भर पडून भुसावळ वीजनिर्मिती केंद्राची स्थापित क्षमता १८७० मेगावॉट होणार आहे. संच क्रमांक सहाचे अभियांत्रिकी, खरेदी आणि उभारणीचे काम मेसर्स भेल कंपनी करीत आहे. यापूर्वी कोराडी येथे प्रत्येकी ६६० मेगावॉटच्या तीन संचांतून वीजनिर्मिती सुरू आहे. चंद्रपूर येथे २९२० मेगावॉट, कोराडी येथे २१९० मेगावॉट, आता भुसावळ येथे १८७० मेगावॉट हे महानिर्मितीचे तिसरे मोठे वीजनिर्मिती केंद्र म्हणून साकारणार आहे. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून या संच क्रमांक सहाला जूनमध्ये कार्यान्वित करण्याचे, तसेच ऑगस्टमध्ये हा संच पूर्णक्षमतेने वाणिज्यिक तत्त्वावर वीजनिर्मिती करेल, असे प्रकल्प अधिकार्यांचे नियोजन आहे. भुसावळ प्रकल्पाचे अधिकारी, अभियंते, कर्मचारी, कामगार अथक परिश्रम घेत असल्याचे मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी सांगितले.